हवेली बाजार समिती निवडणूक ; महाविकास आघाडी होण्याआधीच सुरुंग | पुढारी

हवेली बाजार समिती निवडणूक ; महाविकास आघाडी होण्याआधीच सुरुंग

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : हवेली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे एकत्रित पॅनेल होण्याआधीच आघाडीला सुरुंग लागला असल्याचे चित्र शनिवारी ( दि.25) रात्री डोणजे (ता.हवेली) येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडीच्या मेळाव्यात पाहावयास मिळाले. काही जण नेत्यांच्या नावाने मतदारांत संभ—म निर्माण करत आहेत. त्यांनी अप्रचार थांबवावा, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी या वेळी दिला .
निवडणुकीसाठी इच्छुक असलेले पश्चिम हवेली, सिंहगड भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही प्रमुख नेत्यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली. त्याचीच जोरदार चर्चा मेळाव्यात झाली.

जिल्हाध्यक्षांनी महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवणार आहे. पक्षाचा दुसरा कोणताही पॅनेल नाही. नेत्यांनी कोणालाही पाठिंबा दिला नाही असे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षासह तालुक्यातील पक्षाचे प्रमुख नेते , इच्छुक उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, सिंहगड पश्चिम हवेली भागातील ग्रामपंचायती व सहकारी सोसायटीचे मोजकेच मतदार उपस्थित होते. नेत्यांनी शब्द दिला आहे, असे सांगून पश्चिम हवेलीतील काही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांनी मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. याचे पडसाद डोणजे मेळाव्यात उमटले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आम्हाला शब्द दिला आहे, असा प्रचार करून काही जण मतदारांत संभ्रम करत आहेत. पवार यांच्या आदेशानुसारच महाविकास आघाडी होत आहे.त्यामुळे अप्रचार थांबवावा. माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, हेमंत पारगे, सुधाकर गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले , जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक प्रवीण शिंदे, माजी संचालक प्रकाश म्हस्के, माजी उपमहापौर दिलीप बराटे, दीपक मानकर, बाजार समितीचे माजी सभापती माणिक गोते, माजी उपसभापती बाळासाहेब पारगे, सोन्याबाप्पू चौधरी, हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, सोपान कांचन, खडकवासला विधानसभा अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, खांदवे, र्त्यंबक मोकाशी, महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती पूजा पारगे, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती किसन जोरी, सचिन घुले, संदीप तुपे आदी उपस्थित होते.

 

Back to top button