पुण्यातील कोंढव्यात परदेशी महिलांना मसाज सेंटरमध्ये नोकरी देऊन वेश्या व्यवसाय | पुढारी

पुण्यातील कोंढव्यात परदेशी महिलांना मसाज सेंटरमध्ये नोकरी देऊन वेश्या व्यवसाय

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोंढव्यातील एका मसाज सेंटरमध्ये परदेशी महिलांना नोकरीस ठेवून व्हिसा कागदपत्रांची पूर्तता न केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या परकीय नागरिक नोंदणी विभागाकडून (एफआरओ) मसाज सेंटरचा मालक, व्यवस्थापकासह जागा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. कोंढव्यातील एका मसाज सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा प्रकार एफआरओच्या पथकाने उघडकीस आणला होता. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या कारवाईत पोलिसांनी चार परदेशी महिलांना ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतलेल्या चार महिला मूळच्या थायलंडच्या असून, त्या नोकरी करण्याचा व्हिसा नसताना मसाज सेंटरमध्ये काम करत असल्याचे चौकशीत उघडकीस आले होते.

ताब्यात घेण्यात आलेल्या चार महिलांना मुंढव्यातील शासकीय महिला सुधारगृहात ठेवण्यात आले असून, त्यांची रवानगी लवकरच त्यांच्या मायदेशात करण्यात येणार आहे. विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त आर. राजा म्हणाले की, परकीय नागरिक नोंदणी विभागाच्या नियमावलीनुसार परदेशी व्यक्तीने नोकरी करण्यासाठी व्हिसासंदर्भातील आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. मसाज सेंटरचा मालक, व्यवस्थापक, व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देणार्‍या मालकाने आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न केल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार महिलांना लवकरच मायदेशी पाठविण्यात येणार आहे.

 

Back to top button