संभाव्य पाणीबाणी: दोन दिवसांत ‘आकस्मिक आराखडा’ सादर करा ; राज्य शासनाचे पालिकेला आदेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अलनिनोमुळे संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन राज्य शासनाने सर्व महापालिकांना ’आकस्मिक पाणीपुरवठा नियोजन आराखडा’ तयार करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने शहराला उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन काय उपाययोजना करता येतील यासंबंधीचे नियोजन करून ते शासनाला कळवायचे आहे.
या वर्षी अलनिनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस लांबून राज्यात पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच या वर्षी समाधानकारक पाऊस झाला असला तरी काही भागात सरासरी पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अशा भागात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शहरी आणि ग्रामीण भागातील उन्हाळ्यात पाणी आणि पुढे पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात पाणी संकट उभे राहू नये यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
यासंदर्भात राज्य शासनाने पुणे, पिंपरी चिंचवडसह सर्व महापालिकांना ’पाणी व्यवस्थापन आराखडा’ व काही आकस्मिक परिस्थिती उद्भवल्यास त्या परिस्थितीत पाणीपुरवठा नियमित राहण्यासाठी आकस्मिक पाणीपुरवठा नियोजन आराखडा तयार करावेत असे आदेश दिले आहेत. येत्या 28 मार्चपर्यंत हा आराखडा तयार करून राज्य शासनाला सादर करायचा आहे.
महापालिकेकडून 15 ऑगस्टपर्यंतचे नियोजन
पुणे महापालिकेकडून दरवर्षी साधारण 15 जुलैपर्यंतच्या शहराच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जाते. या वर्षी मात्र संभाव्य पाणी टंचाईचे संकट लक्षात घेऊन दि. 15 ऑगस्टपर्यंतचे पाणीपुरवठ्याचे नियोजन केले असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच यंदा धरणातील पाणीसाठा मुबलक असून शहराला पाणी संकटाला सामोरे जावे लागणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.
शहराच्या पाणीपुरवठ्याच्या नियोजनाबाबत नुकतीच पाटबंधारे विभाग आणि महापालिका प्रशासन यांच्यात आढावा बैठक झाली. त्यात पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले असून शासनाच्या सूचनेनुसार लवकरच ’आकस्मिक पाणीपुरवठा नियोजन आराखडा’ तयार करण्यात येईल.
– अनिरुद्ध पावसकर, पाणीपुरवठा विभागप्रमुख, पुणे मनपा.