पुणे : महिला सक्षमीकरणाचा नारा बुलंद ; ‘पुढारी कस्तुरी क्लब’तर्फे आयोजित बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद | पुढारी

पुणे : महिला सक्षमीकरणाचा नारा बुलंद ; 'पुढारी कस्तुरी क्लब’तर्फे आयोजित बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : ’स्त्रीशक्तीचा विजय असो’… ’सबसे भारी, ये नारी’… ’जय भवानी, जय शिवाजी’… अशा जयघोषात महिला सक्षमीकरणाचा नारा बुलंद करणार्‍या महिलांच्या भव्य बाईक रॅलीचा जल्लोष रविवारी (दि. 26) पाहायला मिळाला. दै. ’पुढारी’ व ’पुढारी कस्तुरी क्लब’तर्फे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. ’पुढारी कस्तुरी क्लब’च्या सदस्यांसह महिलांनी रॅलीत हिरिरीने सहभाग घेतला.

गुढीपाडव्यानिमित्त आणि मराठी नववर्षानिमित्त ’डाबर ग्लुकोप्लस सी’प्रस्तुत या भव्य महिला बाइक रॅलीचा आवाज सगळीकडे दुमदुमून गेला. रॅलीमध्ये हजारो महिला पारंपरिक वेशभूषा परिधान करीत उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. एकीकडे पारंपरिकतेचा साज आणि दुसरीकडे आधुनिकतेची कास, असे चित्र या वेळी पाहायला मिळाले. ‘कलर्स मराठी’वरील ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेतील मुख्य नायक अर्जुनची भूमिका करणारे इंद्रनील कामत, मुख्य नायिका सावीची भूमिका करणार्‍या रसिका वाखारकर, बिग बॉस फेम सीझन कंटेस्टंट अमृता धोंगडे, ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतील चित्राची भूमिका साकारणार्‍या प्रतीक्षा मुणगेकर यांच्यासह स्वारगेट पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक आर. आर. पाटील, भरोसा सेलच्या पोलिस उपनिरीक्षक तेजस्वी पवार यांनी ‘फ्लॅग ऑफ’ केला.

डाबर ग्लुकोप्लस सीचे असद अब्बास, सेन्को गोल्ड अँड डायमंड्सचे संजय हुंजे, कलर्स मराठीच्या सुजाता सामंत हे प्रायोजकही रॅलीत सहभागी झाले. रॅलीला सकाळी नऊ वाजता सारसबागेजवळील मित्रमंडळ चौक येथील दै. ‘पुढारी’च्या कार्यालयापासून प्रारंभ झाला. रॅलीसाठी सजविलेल्या जीपमध्ये बसून कलाकारांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला. गुढी हातात घेऊन मराठी नववर्षाच्या शुभेच्छांचीही देवाणघेवाण झाली. बाजीराव रस्ता, शनिवारवाडा, पुणे महापालिका, शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, कर्वे रस्ता, नळस्टॉप, म्हात्रे पूल, सेनादत्त पोलिस चौकी, दांडेकर पूल, महालक्ष्मी मंदिर या मार्गाने रॅलीची 10.15 वाजता पुढारी कार्यालयाजवळ सांगता झाली.

या रॅलीत कस्तुरी सदस्यांसह इतर महिलांनीही सहभाग घेतला. रॅलीचे ज्वेलरी पार्टनर सेन्को गोल्ड अँड डायमंड्स आणि एंटरटेन्मेंट पार्टनर कलर्स मराठी हे होते. महिलांचे ग्रुप घेऊन येणार्‍या ग्रुप लिडरला ट्रॉफी देऊन रंगमंचावर सन्मानित करण्यात आले. बाइक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकीला प्रशस्तिपत्र आणि सेन्को गोल्डकडून आकर्षक गिफ्ट देऊन गौरविण्यात आले.

सादरीकरणाने भरले रंग
शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीतील तरुणींनी लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी अशा साहसी खेळांची प्रात्यक्षिके सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. रास्ता पेठेतील स्वामी ओम प्रतिष्ठानच्या ढोल-ताशा पथकाने केलेल्या वादनाने वातावरणात रंग भरले. धैर्य मर्दानी आखाडा आणि सुनंदा ढेरे लेझीम पथकानेही रॅलीत सहभाग घेतला.

सेल्फीचा उत्साह

आकर्षक रंगांच्या नऊवारी साड्या, पारंपरिक अलंकार, नाकात नथ, चंद्रकोर असा साजशृंगार करीत महिला रॅलीच्या ठिकाणी उपस्थित होत्या. कलाकारांबरोबर, मैत्रिणींबरोबर सेल्फी घेत या वेळी मोबाईलचा क्लिकक्लिकाट झाला.

Back to top button