राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महाराष्ट्राला आणि देशाला लागलेली कीड ; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची जहरी टीका | पुढारी

राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महाराष्ट्राला आणि देशाला लागलेली कीड ; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची जहरी टीका

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महाराष्ट्र आणि देशाला लागलेली कीड आहे, अशी जहरी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इंदापुरात केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत इंदापूर तालुक्यात रविवारी (दि. २६) भाजपा युवा मोर्चा आणि युवा वाॅरियर्सच्या ५२ शाखांची उद्घाटने पार पडली आहे. यानंतर उशिरा रात्री ते माध्यमांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे दुतोंडी

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होताना अनेक वेळा तुम्ही बघितला आहे आणि आता म्हणत आहात की आम्ही सावरकरांचा अपमान सहन करणार नाही. तर मग त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही का बसला आहात? असा सवाल उपस्थित करत एकीकडे मांडीला मांडी लावून बसता आणि दुसरीकडे त्यांनी केलेला अपमान सहन करायचा नाही असे म्हणता. यावरून उध्दव ठाकरे हे दुतोंडी आहेत, असा घनाघात बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

तुम्ही हिंदुत्व सोडल्यामुळेच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंना बाहेर पडावं लागलं

मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो या काळात एक दिवस दाखवा की मी हिंदुत्व सोडलं आहे असं खुलं आव्हान उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीला दिलेयं. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलेयं. १०० वेळा हिंदुत्व सोडलय आणि एक हजार उदाहरणे देता येतील कशाला तोंड उघडता, आता अशा शब्दात उत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जेव्हा हिंदुत्वाची चिरफाड करत होती तेव्हा ठाकरे शांत बसत होते. ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्यामुळेच एकनाथ शिंदेंना ५० आमदारांना घेऊन निर्णय घ्यावा लागला आणि राज ठाकरेंना देखील शिवसेनेतून बाहेर यावे लागले. त्यामुळे हिंदुत्वाचा अपमान तुम्ही जेवढा केला तेवढा या देशात कोणीच केला नसल्याची टीका बावनकुळे यांनी केली.

पुढे पहा महाराष्ट्रात काय होते

माझ्या कुळाचा उल्लेख करून उद्धव ठाकरेंना आनंद मिळतोय. माझ्या कुळाचा उल्लेख करतात, यावरूनच ते किती घाबरलेत हे दिसत आहे. पुढे महाराष्ट्रात काय होतंय ते पहा. आजचे उरलेसुरले आहेत त्यातील चारच राहतील. आम्ही हिंदुत्वाचे रक्षण करणारे कार्यकर्ते आहोत, तुमच्यासारखे पळपुटे नाही अशा शब्दात बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला.

यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, गणेश भेगडे, विक्रांत पाटील, अनुप मोरे, दिपक काटे, पृथ्वीराज जाचक, रंजन तावरे, दिलीप खैरे, विलास वाघमोडे, ॲड. शरद जमदार आदी मान्यवर उपस्थित होते.

Back to top button