

देहूगाव : येथे दिवसाढवळ्या उघड्या दरवाज्यावाटे घरात प्रवेश करून तब्बल 11 लाख 22 हजारांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना गुरुवारी (दि. 23) सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत देहूगाव येथील बाजारपेठ असलेल्या परिसरात घडली. याप्रकरणी नितीन गोपाळ मोरे (वय 58, रा. देहूगाव) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्यांच्याविरोधात देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरातून सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत चोरट्याने उघड्या दरवाज्यावाटे घरात प्रवेश केला. घरातील बेडरुममध्ये असलेल्या कपाटातील ड्रॉव्हरमधून साडे 26 तोळे वजनाचे 11 लाख 22 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून केले. या प्रकरणाच पुढील तपास देहूरोड पोलिस करत आहेत. दिवसाढवळ्या चोरीचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी परिसरात गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.