

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अनिल याने पोवाडा सादर करतानाचा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला अन् बघता बघता त्यावर लाईक्सचा वर्षाव झाला. त्याच्या पोवाड्याला नेटिझन्सनी पसंतीही दर्शविली…काळाप्रमाणे बदलत आता लोककलावंतांची नवी पिढी टेक्नोसॅव्ही बनली असून, अस्सल लोककलेचा बाज जगभरातील लोकांपर्यंत पोचविण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा सकारात्मक वापर सुरू केला आहे.
काहीजण फेसबुक लाइव्हद्वारे लोकगीते सादर करतात, तर काहीजण भारूड, भजन, कीर्तन…अशा लोककलांचे व्हिडिओ यु-ट्यूब चॅनेलवर अपलोड करीत आहेत. त्याला चांगले व्ह्युव्ज आणि फॉलोअर्सही मिळत आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब चॅनेलद्वारे नवोदित लोककलावंत पोवाडा, भारूड, गोंधळ, पोतराज, वासुदेव अशा विविध लोककला पोचविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सध्या कीर्तनकारांपासून ते शाहिरांपर्यंत….अशा लोककलांचे सादरीकण ऑनलाइन पाहायला मिळत आहे. काहींजणांनी तर फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अधिकृत पेज सुरू केले असून, त्यात विविध रिल्सद्वारेही लोककलांचे सादरीकरण केले जात आहे.
डॉ. देखणे यांचा वारसा
संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक कै. डॉ. रामचंद्र देखणे यांनीही लोककलांचा वारसा आयुष्यभर जपला. त्यांच्या निधनानंतर त्यांचा हाच वारसा जपण्यासाठी त्यांचे पुत्र डॉ. भावार्थ देखणे हे प्रयत्न करीत आहेत. डॉ. देखणे म्हणाले, आमची नवोदित लोककलावंतांची पिढी लोककला जगभरात पोचविण्यासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करीत आहेत. माझ्या कुटुंबात भारुडाची परंपरा आहे, मीही ती परंपरा जपत आहे. जात्यावरच्या ओवीपासून ते लावणीपर्यंत…असा लोककलांच्या प्रवासावर आधारित कार्यक्रम करीत असून, त्याला ऑनलाइन चांगला प्रतिसाद आहे.
सर्वच लोककलावंत आता सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. पण, खासकरून आमची नवी पिढीही सोशल मीडियाचा चांगला उपयोग कताना दिसत आहे. यू-ट्यूब चॅनेलवर मी पोवाड्याचे काही व्हिडिओ पोस्ट करतो. त्याला चांगले व्ह्युव्ज मिळतात. शाहीर हेमंत मावळे यांच्या लोककलेचा वारसा असा जपला जात आहे.
– होनराज मावळे, शाहीर.