

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भाजी करायची म्हटलं तर तिखट लागतंच. मात्र, लहरी हवामानामुळे उत्पादनात घट झाल्याने पुण्याच्या बाजारपेठेत लाल मिरचीची आवक घटली आहे. शहरात उन्हाळी कामांना सुरुवात झाल्याने घरगुतीसह कारखानदारांकडून मिरचीला मागणी होत आहे. त्यातुलनेत आवक नसल्याने मिरचीचे भाव उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. किरकोळ बाजारात लाल मिरचीची 280 ते 810 रुपये प्रतिकिलो दराने विक्री सुरू आहे. सध्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील भुसार बाजारात दररोज तीस किलोंच्या दीडशे ते तीनशे पोत्यांची आवक होत आहे.
गतवर्षी लहरी हवामानामुळे उत्पादनात घट होऊन शीतगृहातील मिरचीच्या साठवणुकीतही मोठी घट झाली. त्यानंतर, यंदाही अवकाळी पाऊस, गारपीट तसेच रोगाच्या प्रादुर्भावामुळे मिरचीच्या उत्पादनात घट झाली आहे. दरम्यान, शीतगृहातून पुरवठा होणार्या मिरचीचा साठा संपल्याने सध्या बाजारात नव्या हंगामातील मिरची दाखल होत आहे. स्थानिक बाजारपेठांमध्ये निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात मिरचीची खरेदी करण्यात येत आहे. त्याचा परिणाम शहरातील आवकेवर झाला असल्याची माहिती मिरचीचे व्यापारी वालचंद संचेती यांनी दिली.
ब्याडगी मिरचीच्या भावात गतवर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली आहे. वाढलेल्या दरांमुळे यंदा गुजरात येथूनही मिरची बाजारात दाखल होत आहे. मात्र, त्याचेही दर तेजीत आहेत. लाल मिरचीच्या भावात येत्या काळात मंदी येण्याची सूतरामही शक्यता नाही.
– बाळासाहेब कोयाळीकर, मिरचीचे व्यापारी.
आंध— प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेशात सर्वाधिक उत्पादन
भारतामध्ये आंध— प्रदेशात सर्वाधिक लाल मिरचीचे उत्पादन घेतले जाते. त्यानंतर कर्नाटक आणि पाठोपाठ मध्य प्रदेशात उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रातील खान्देशात लाल मिरचीचे उत्पादन घेतले जाते. तेलंगणात तिखट, तर कर्नाटकात कमी तिखटाच्या मिरचीचे उत्पादन घेण्यात येते. याशिवाय आसाम आणि पश्चिम बंगाल, पंजाब राज्यांमध्येही उत्पादन घेतले जाते.
का झाली दरवाढ
लहरी हवामानामुळे उत्पादनात घट
उत्पादन क्षेत्रातून निर्यातीत वाढ
गतवर्षी झालेली कमी साठवणूक