पिंपरी : लावणीत करिअर; उच्चशिक्षित तरुणींनाही भुरळ | पुढारी

पिंपरी : लावणीत करिअर; उच्चशिक्षित तरुणींनाही भुरळ

वर्षा कांबळे

पिंपरी : ठसकेबाज लावणी ही महाराष्ट्राची ओळख आहे. आणि लावणी म्हटलं की समोर येतात त्या विविध लावण्यांवर नृत्याची अदाकारी करणार्‍या लावणी कलाकार. पूर्वी लावणी सादर करणार्‍या या कलाकार महिला अशिक्षित किंवा अल्पशिक्षित होत्या; परंतु काळानुसार लावणी बदलत गेली. हल्ली उच्चशिक्षण घेणार्‍या तरुणींनाही लावणीची भुरळ पडली आहे. आवड जपण्याबरोबरच या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहत आहेत.

गेल्या कित्येक वर्षांपासून लावणी महाराष्ट्रातील लोकांचे मनोरंजन करत आली आहे. शहरात कमी प्रमाण असेल, पण गावजत्रांमध्ये लावणीशिवाय जत्रेला मजाच नाही. ग्रामीण भागातील नागरिकांचे मनोरंजन करण्याचे काम आजही लावणी करते. पारंपरिक लावणीमध्ये ढोलकी, तुणतुणे, तबला, पेटी आणि सारंगी यांच्या साथीने घुंघरांच्या तालावर ठेका धरून अन् अदाकारी करणार्‍या लावणी कलाकार हे आजही प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवितात.

सध्या लावणीमध्ये डीजे आणि ऑर्केस्ट्रा यांचा शिरकाव होत आहे. मात्र, काही पारंपरिक लावणी कलाकार आजही लावणी या लोककलेला टिकविण्यासाठी धडपड करत आहेत. अलीकडच्या काळात लावणी देशातच नाही, तर परदेशातही पोहोचली आहे. याबाबत काही उच्च शिक्षण घेणार्‍या तरुणींच्या घेतलेल्या मुलाखती.

मेकअप आर्टिस्ट आणि लावणीपण..
मी सध्या कॉलेजच्या प्रथम वर्षात शिकत आहे. यापूर्वी मी फॅशन डिझायनिंग, मेकअप यांचे शिक्षण घेतले आहे. लावणीची आवड असल्यामुळे मी या क्षेत्रामध्ये आले आहे. लावणीचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही. महाराष्ट्राची लोकधारा यात मी काम केले आहे. लावणी म्हणजे फक्त पारपंरिक लावणी ही मला आवडते आणि मी ती सादर करते. -दीप्ती आहेर

हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण सांभाळून लावणीची आवड
लहानपणी माझ्या आईची हौस होती की, मी लावणी शिकावी. यासाठी तिने मला क्लासेस देखील लावले. मला तशी आवड नव्हती, पण आईच्या आग्रहास्तव शिकले आणि काही कार्यक्रमांमध्ये लावणी सादर करू लागले. मोठी झाल्यानंतर लावणी म्हणजे काय हे कळायला लागले तसे मला लावणी आवडायला लागली. सध्या मी बेकरी आणि हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. या शिक्षणाबरोबरच मी कुठे लावणी महोत्सव असेल किंवा स्पर्धा असेल त्याठिकाणी आवर्जून जाते. ही आपली लोककला आणि संस्कृती आहे हा वारसा मला पुढे चालवायचा आहे.              -ऊर्मिला धुरत

 लावणीमधील जिवंतपणा ठेवण्याची धडपड
गुलाबबाई संगमनेरकर यांची मी नात आहे. माझ्या आजीपासून डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत झाकलेली आणि प्रेक्षकांचा मान राखणारी अशी जी लावणी चालत आहे. तोच वारसा आम्ही पुढे चालवित आहोत. यामध्ये कुठेही बीभत्सपणाला थारा नसतो. लावणी ही महाराष्ट्राची शान आहे आणि तिची शान तशीच कायम राहील, असा आमचा प्रयत्न असतो.             -रूही संगमनेरकर

आजीपासून चालत आलेला वारसा
माझ्या आजीपासून लावणीचा वारसा आम्हाला मिळाला आहे. तो आम्ही पुढे चालवित आहोत. लावणी करताना कोणताही कमीपणा वाटत नाही. लावणीला खूप मोठा इतिहास आहे. महाराष्ट्रात दीर्घकाळापासून लावणी चालत आली आहे आणि तिला पारंपरिक स्वरूपातच सादर करण्यात आम्हाला अभिमान वाटतो.                           -सोनाली जळगावकर

तरुणींसारखे तरुणांचेही लावणी ग्रुप
पूर्वीच्या काळी तमाशा व भारुडामध्ये स्त्री कलावंत नव्हते. त्या वेळी पुरुषच महिलांच्या भूमिका करत. आता काळानुसार चित्र बदलले आहे. तरुणदेखील महिलांच्या वेशभूषेत महिलांना तोडीसतोड अशी पारंपरिक लावणी सादर करत आहेत. यामध्ये काही शेतकरी मुले, नोकरदार पुरुष आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांचादेखील समावेश आहे, असे जय मल्हार कला मंडळातील लावणी कलाकार उमेश राजे याने सांगितले. त्यांच्या ग्रुपमध्ये किरण कुंभार, डेनी राऊत, संगम गोवर्धन आणि गौरव गावडे हे आहेत.

Back to top button