पवना बँकेच्या निवडणुकीतून आठ उमेदवारांची माघार | पुढारी

पवना बँकेच्या निवडणुकीतून आठ उमेदवारांची माघार

पिंपरी : शहरातील सुवर्णमहोत्सवी वाटचाल पूर्ण करीत असलेल्या पवना सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रिंगणातून आतापर्यंत आठ जणांनी माघार घेतली असून, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याच्या दिशेने जोरदार वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे.
पवना सहकारी बँकेची निवडणूक नऊ एप्रिलला होणार आहे.

बँकेच्या संचालक मंडळाच्या 19 जागांसाठी एकूण 46 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आतापर्यंत विक्रम जनार्दन बोडके, इंद्रजीत नाणेकर, विनोद लांडगे, दत्तोबा लांडगे, तुकाराम बजबळकर, दत्तात्रय बहिरवाडे, सुरेखा लांडगे व सुवर्णा गव्हाणे या आठ उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 28 मार्चपर्यंत मुदत आहे.

माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पवना सहकारी बँकेने नेत्रदीपक प्रगती केली आहे. बँकेच्या प्रगतीची ही घोडदौड अशीच पुढे सुरू राहण्यासाठी लांडगे यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलला आम्ही पाठिंबा देत आहोत. बँकेच्या सर्वच सदस्यांचा अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलवर पूर्ण विश्वास असून ही निवडणूक बिनविरोध होईल,अशी खात्री माघार घेतलेल्या उमेदवारांनी व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात जुनी बँक असलेल्या पवना सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनेल जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या अण्णासाहेब मगर सहकार पॅनलमधून 19 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. जुने-नवे असा समतोल साधून संचालकपदासाठी उमेदवार दिले आहेत.

पवना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची 2022-23 ते 2027-28 या काळासाठीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे.9 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णासाहेब मगर सहकार पॅनल जाहीर करण्यात आले आहे.

सर्वसाधारण गटातून ज्ञानेश्वर लांडगे, विठ्ठल काळभोर, शांताराम गराडे, जयनाथ काटे, शिवाजी वाघेरे, शामराव फुगे, शरद काळभोर, सचिन चिंचवडे, अमित गावडे, चेतन गावडे, सुनील गव्हाणे, जितेंद्र लांडगे, बिपीन नाणेकर, सचिन काळभोर तर अनुसूचित जाती गटातून दादू डोळस, महिला राखीव गटातून जयश्री गावडे, उर्मिला काळभोर, इतर मागासवर्गीय गटातून वसंत लोंढे आणि भटक्या विमुक्त जाती गटातून संभाजी दौडकर यांचा पॅनेलमध्ये समावेश आहे.

Back to top button