तळेगावात धावले 350 बैलगाडे | पुढारी

तळेगावात धावले 350 बैलगाडे

तळेगाव दाभाडे : ग्रामदैवत श्री महाराजांच्या सार्वत्रिक उत्सवानिमित्त आयोजित शर्यतीत 350 बैलगाडे धावले. पहिल्या दिवशी (दि. 22) घाटाच्या राजाचा मान गहुंजे गावाचे सरपंच कुलदीप गोविंद बोडके यांच्या बैलगाडाने तर दुसर्‍या दिवशी (दि. 23) घाटाच्या राजाचा मान शिवतेज स्वप्निल काळोखे यांच्या बैलगाडाने पटकाविला. पहिल्या दिवशी 170 गाडे धावले. अंतिम फेरीत साईनाथ कुटे, बाबू वाल्हेकर, मारुती कदम, कृष्णा चिंचवडे यांचे बैलगाडा होते. तर, दुसर्‍या दिवशी 180 गाडे धावले. यामध्ये अंतिम फेरीत नारायण भोते, शिवतेज काळोखे, किरण वाघोले, कुणाल आंद्रे यांचे बैलगाडा होते.

मंदिरामध्ये अभिषेक
गुढीपाडव्यानिमित्त पहाटे श्री ग्रामदैवत डोळसनाथ महाराज मंदिरामध्ये अभिषेक करण्यात आला. सायंकाळी मंदिरातून ग्राम प्रदक्षिणेसाठी पालखीचे प्रस्थान झाले. या वेळी श्रीमंत सरसेनापती सत्येंद्रराजे दाभाडे सरकार, माजी मंत्री संजय भेगडे, राजेंद्र सरोदे, समितीचे अध्यक्ष प्रणव भेगडे, पदाधिकारी व पालखीचे मानाचे खांदेकरी भोई समाजातील समाजबांधव सहभागी झाले होते.

पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी
ग्रामप्रदक्षिणेसाठी पालखी मंदिरापासून सरसेनापती दाभाडे यांच्या वाड्यावर आली. तेथे औक्षण झाल्यानंतर पुन्हा मंदिरापासून भेगडे आळी, गणपती चौक, भोई आळी, राजेंद्र चौक, मारुती मंदिर, जिजामाता चौक, सुभाष चौक, शाळा चौक, गणपती मंदिरापासून श्री डोळसनाथ मंदिरापर्यंत पालखी प्रदक्षिणा संपन्न झाली. पालखीच्या पुढे ढोल-लेझीम, बँड, भजनकरी तसेच उंट, घोडे होते. पालखीच्या मार्गावर अनेक महिला, पुरुष यांनी दर्शनाचा लाभ घेतला.

Back to top button