देहूतील 16 फुटी रस्त्याचा प्रश्न सुटणार | पुढारी

देहूतील 16 फुटी रस्त्याचा प्रश्न सुटणार

देहुगाव : देहुगावातील महाप्रेशद्वाराजवळील पाण्याची टाकी ते पचपिंड चौकादरम्यान सुरू असलेल्या 16 फुटी रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार आहे. या रस्त्याबाबत हरकती घेतलेल्या शेतकर्‍यांची नगर पंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांच्या समोर शुक्रवारी सुनावणी झाली. या वेळी संबंधित शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याबाबत नगर पंचायतीच्या आगामी बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे मुख्याधिकार्‍यांनी सांगितले. बाधित शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले.

सात शेतकर्‍यांच्या हरकती
देहूतील महाद्वार चौक पाण्याची टाकी ते पचपिंड चौकादरम्यान असलेल्या 16 फूट रुंदी आणि 750 फूट लांबी असलेल्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे काम नगर पंचायतीच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या कामाला सात शेतकर्‍यांनी हरकत घेतली होती. देहुतील विकासकामासाठी आमच्या बर्‍याच जमिनीचे संपादन झाले आहे. मात्र, आजपर्यंत आम्हाला कोणतीही नुकसानभरपाई अथवा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे या रस्त्यात आमची जमीन जात असल्याने शेतीचे क्षेत्र कमी होणार आहे. त्यामुळे आमचे मोठे नुकसान होत आहेत. विकासकामांना आमचा विरोध नाही. उलट आम्ही सहकार्य करू. मात्र, आम्हाला नुकसानभरपाई आणि एफएसआय, टीडीआर मिळावा, अशी भूमिका घेत बाधित शेतकर्‍यांनी रस्त्याच्या कामावर हरकत घेतली होती.

विकासकामांना सहकार्य; पण नुकसानभरपाई द्या
यासंदर्भात शुक्रवारी देहुनगर पंचायत कार्यालयात मुख्याधिकारी डॉ. जाधव यांच्यासमोर सुनावणी झाली. या वेळी बाधित शेतकरी नगरसेवक प्रवीण काळोखे, प्रदीप काळोखे, दत्ता बांगर, संजय हगवणे, संजय मोरे, सुभाष मोरे आदी उपस्थित होते. देहू देवस्थानचे विश्वस्त संजयमहाराज मोरे आणि ज्येष्ठ शेतकरी सुभाष मोरे यांनी बाधित शेतकर्‍यांच्या वतीने म्हणणे मांडले. या वेळी विकासकामांना सहकार्य करू; पण बाधित नुकसानभरपाई देण्याची आग्रही मागणी या वेळी करण्यात आली.

सर्वसाधारण बैठकीत तोडगा काढण्याचे आश्वासन
मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी नगर पंचायतीच्या आगामी सर्वसाधारण बैठकीत बाधित शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याबाबत चर्चा करून योग्य तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. या वेळी उपाध्यक्षा शीतल हगवणे, नगरसेविका प्रियंका मोरे, नगरसेवक योगेश काळोखे, प्रवीण काळोखे, बांधकाम अभियंता संघपाल गायकवाड आदी उपस्थित होते.

Back to top button