तळेगावातील चौकांचे होणारे सुशोभिकरण

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेतर्फे ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत चौकाचौकांत होणारे सुशोभिकरण, जागोजागी उभारण्यात आलेली कारंजी, शैक्षणिक बेटी बचावो, बेटी पढाओ स्मारक, ऐतिहासिक प्रवेशव्दार कमान, नियोजित शिवशंभो स्मारक आदी उपक्रमांमुळे तळेगाव शहर निश्चितच स्वच्छ, सुंदर, हरित करण्यात आपण यशस्वी होतोय, असे मत मुख्याधिकारी विजकुमार सरनाईक यांनी ‘पुढारी’ बोलताना व्यक्त केले.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत ‘माझी वसुंधरा’ अभियान सुरू झाले असून, या अंतर्गत पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश या निसर्गाशी संबंधित पाच तत्त्वांसोबतच जीवन पद्धती अंगीकारल्याशिवाय आपण शाश्वत विकास करू शकणार नाही. सद्यस्थितीत हीच वेळ निसर्गास साथ देण्याची आहे. त्यासाठी निसर्गाशी संबंधित या पाच तत्त्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान हे आपल्या शहरामध्ये राबविण्यात येत असल्याचे उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, सुवर्णा काळे यांनी सांगितले.
जनजागृतीसाठी भिंतीचित्रे
तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांमध्ये ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत जनजागृती करण्याच्या दृष्टीने मुख्याधिकारी सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध ठिकाणी सुशोभिकरण उपक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील विविध ठिकाणी चौकात तसेच रस्त्याच्या बाजूने भित्तीचित्रे काढण्यात आली आहेत.
यामध्ये माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ भारत अभियानाच्या जनजागृतीच्या दृष्टीने चित्रे रेखाटण्यात आली आहेत. तसेच, शहरातील शांताई सिटी सेंटरजवळील एका जुन्या विहिरीचे बांधकाम करून याठिकाणी कारंजेदेखील तयार करण्यात आले आहे. तसेच, कारंजे इंगल तलावातदेखील उभारण्यात आले आहे. ज्या ठिकाणी पाण्याचा जीवंत स्त्रोत्र आहे त्याठिकाणी अशी कारंजी उभारण्याचा मानस मुख्याधिकारी यांनी व्यक्त केला. या उपक्रमाच्या माध्यमातून शहराच्या सौंदर्यीकरणामध्ये निश्चितच भर पडली आहे.