अभियोग्यता चाचणीचा निकाल जाहीर पण... परीक्षा परिषदेचे संकेतस्थळ ‘हँग’ झाल्यामुळे उमेदवार निकालापासून वंचित | पुढारी

अभियोग्यता चाचणीचा निकाल जाहीर पण... परीक्षा परिषदेचे संकेतस्थळ ‘हँग’ झाल्यामुळे उमेदवार निकालापासून वंचित

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शिक्षक भरतीसाठी राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीचा निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. मात्र संकेतस्थळ हँग झाल्याने अनेक उमेदवारांना निकाल पाहता आला नाही. राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांवरील भरतीची प्रक्रिया पवित्र संकेतस्थळामार्फत राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवार अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीत पात्र ठरणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेने २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेतली.

राज्यातील जवळपास अडीच लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली. त्यानंतर उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा होती. काही दिवसांपूर्वी परीक्षा परिषदेने २४ मार्चच्या सुमारास निकाल जाहीर करण्याचे नियोजन असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर https://www.mscepune.in/या संकेतस्थळाद्वारे शुक्रवारी सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला. मात्र संकेतस्थळावर ताण आल्याने संकेतस्थळ उघडण्यास अडचणी आल्या. त्यामुळे अनेक उमेदवारांना निकाल पाहता आला नाही.

Back to top button