पुणे : उसाच्या ट्रॅक्टरला धडकून युवकाचा मृत्यू

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा : दहिवडी येथील दहिवडी – आंबळे रस्त्यालगत चांदणीचा घाट येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असेलल्या उसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकून सलमान सलीम मुलाणी (वय 32, रा. टाकळी भीमा, ता. शिरूर) या युवकाचा मृत्यू झाला. शिक्रापूर पोलिस ठाण्यात अपघाताबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली. विशाल बाळासाहेब लवांडे (वय 27, रा. मांजरेवस्ती, दहिवडी, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.
शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहिवडी (ता. शिरूर) येथील दहिवडी – आंबळे रस्त्याने सलमान मुलाणी दुचाकी (एमएच 12 क्यूएल 8313) वरून जात असताना चांदणीचा घाट येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असेलल्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला त्याची धडक बसली व त्यात तो गंभीर जखमी झाला. नागरिकांनी त्याला उपचारासाठी शिक्रापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या घटनेचा तपास पोलिस हवालदार राजेश माने करीत आहेत.