भीमा-पाटस पुढील हंगामात करणार 12 लाख टन उसाचे गाळप | पुढारी

भीमा-पाटस पुढील हंगामात करणार 12 लाख टन उसाचे गाळप

खोर : पुढारी वृत्तसेवा : भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना पुढील हंगामात 12 लाख टन उसाचे गाळप करणार आहे. दिवसाला दहा हजार टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक रविकांत पाटील यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेला हा कारखाना निराणी ग्रुपने चालविण्यास घेतला. कारखान्याचे अध्यक्ष आ. राहुल कुल, निराणी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मुरुगेश निराणी, संगमेश निराणी, विजय निराणी, विशाल निराणी यांचे यंदा गाळप किती होतेय, यापेक्षा कारखाना सुरू करण्याचे लक्ष्य होते. पुढील हंगामाची तयारी आतापासूनच सुरू केली आहे.

याबाबत रविकांत पाटील म्हणाले की, कारखान्याचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कारखाना सुरू करण्याचा आमचा मानस आहे. दर दिवसाला 10 हजार टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. दिवसाला 70 हजार लिटर इतकी इथेनॉलची निर्मिती करण्यात येणार आहे. या वर्षी अवघ्या तीन महिन्यांत 3 लाख 15 हजार 194 टन ऊस गाळप करून 11.50 टक्के साखर उतारा मिळविला. या हंगामाप्रमाणे पुढील हंगामात शेतकर्‍यांनी अशीच साथ दिली, तर कारखाना तब्बल 12 लाख टन ऊस गाळप केल्याशिवाय राहणार नाही, असे पाटील यांनी सांगितले.

आ. कुल, उपाध्यक्ष नामदेव बारवकर, संचालक विकास शेलार, तुकाराम ताकवणे आदींसह संचालक मंडळाचे सहकार्य मिळत आहे. पुढील हंगामात कारखाना उसाला चांगला बाजारभाव देईल, असेही रविकांत पाटील यांनी सांगितले.

Back to top button