निरा नदीवरील पुलाला कठडे बसवावेत

निरा : पुढारी वृत्तसेवा : निरा (ता. पुरंदर) येथील पालखीतळाची शुक्रवारी ( दि.24) सकाळी अकरा वाजता पालखी सोहळा प्रमुख व पुरंदरच्या प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जुनच्या महिन्याच्या दुस-या आठवड्यात पुरंदर तालुक्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 24) आळंदी ते पंढरपूर दरम्यानच्या झेंडेवाडी, सासवड, जेजुरी, वाल्हे, निरा येथील पालखीतळाची तसेच पालखी महामार्गाची पाहणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे पाटील यांनी केली.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता स्वाती दहिवाल, वाल्ह्याचे मंडलाधिकारी भारत भिसे, निरेचे उपसरपंच राजेश काकडे, ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण, समर्थ पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश चव्हाण, अनंता शिंंदे आदी उपस्थित होते. अॅड. ढगे पाटील म्हणाले की, पालखी सोहळ्यात वारक-यांना पायी चालताना, मुक्कामाच्या व विसाव्याच्या ठिकाणी अडचणी निर्माण होऊ नये यासाठी सोहळ्यापूर्वी पालखीतळांची व पालखी महामार्गाची पाहणी करीत आहे. ज्या ठिकाणी समस्या आहेत तेथील प्रशासनाला सूचना देत आहोत. पिसुर्टी ते निरा पर्यंतच्या रस्त्याच्या साईडपट्ट्यांचे तसेच रस्त्याचे डांबरीकरण तसेच निरा नदीवरील जुन्या पुलाला संरक्षक कठडे बसविणे गरजेचे आहे.