पुणे : सणसवाडीत ठेकेदाराकडे खंडणीची मागणी ; दोघांवर गुन्हा दाखल

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा : सणसवाडी (ता. शिरूर) येथील एका बांधकाम ठेकेदाराला गावामध्ये कुठेही बांधकाम करायचे असल्यास आम्हाला वीस हजार रुपये प्रतिमहिना पैसे द्यावे लागतील, असे सांगत ठेकेदाराचे अपहरण करून मारहाण करणार्या दोघांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. ऋषिकेश अशोक दरेकर (रा. सणसवाडी, ता. शिरूर), रतन दत्तात्रय कामठे (रा. धानोरे, ता. शिरूर) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत ठेकेदार बापूराव आश्रूबा बहिर (वय 38, रा. रामनगर, पेरणे फाटा, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे.
सणसवाडी येथे बापूराव बहिर हे बांधकामाचे ठेके घेऊन काम करतात.
त्यातून त्यांची ऋषिकेश दरेकर याच्याशी ओळख झाली. दि. 22 रोजी बापूराव यांना ऋषिकेश याने फोन करून सणसवाडी चौकात बोलावून घेतले. काही वेळाने ऋषिकेश व रतन दोघांनी कारमधून सदर ठिकाणी येऊन बापूराव यांना आम्हाला महिन्याला 20 हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी केली. त्यानंतर बापूराव यांना कारमध्ये बसवून सराटेवस्ती येथे घेऊन जात त्यांचे हात बांधून शिवीगाळ व दमदाटी केली. दरम्यान, बापूराव यांनी पैसे देण्याचे कबूल करीत शिक्रापूर पोलिस ठाणे गाठले. घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली. तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार करीत आहेत.