कांदा गेला दुबईला; तक्रार यवत पोलिस ठाण्यात | पुढारी

कांदा गेला दुबईला; तक्रार यवत पोलिस ठाण्यात

केडगाव : पुढारी वृत्तसेवा :  दुबईमध्ये विकलेल्या कांद्याचे पैसे मिळाले नसल्याने जिल्ह्यातील यवत पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार झाली आहे. याबाबत हवेली तालुक्यातील धनंजय सुरेश शितोळे यांच्याविरोधात वाखारी गावचे अक्षय तानाजी काळभोर यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अक्षय तानाजी काळभोर यांनी ‘साक्ष अ‍ॅग्रो’ नावाने आयात-निर्यातीचा व्यापार नव्याने सुरू केला होता. त्याची व्याप्ती वाढावी आणि प्रसार-प्रचार व्हावा, यासाठी त्यांनी सोशल मीडियावर जाहिरात केली होती. यानुसार हवेली तालुक्यातील धनंजय सुरेश शितोळे यांनी संपर्क केला.

काळभोर आणि शितोळे यांनी चर्चा करीत एकत्रित व्यवसाय करण्याचे निश्चित केले. या चर्चेत ठरल्याप्रमाणे काळभोर यांनी शितोळे यांना रोख रक्कम 9 लाख रुपये आणि वेगवेगळ्या बँक खात्यांवर 9 लाख रुपये असे एकूण 18 लाख रुपये दिले, अशी माहिती काळभोर यांनी दिली आहे. काळभोर यांनी रक्कम देऊन स्वतःच्या शेतातील साठवणीत असलेला कांदा दुबईला पाठविण्यासाठी शितोळे यांच्याकडे दिला. शितोळे यांच्या मध्यस्थीने शाहरुख सन्स ट्रेडिंग कंपनी दुबई यांना हा कांदा विकला असून, त्याचे पैसे दिले नाहीत. याबाबत शितोळे यांनी काळभोर यांना 18 लाखांचे धनादेश दिले होते. मात्र, संबंधित धनादेश वटले नाहीत. त्यामुळे काळभोर हे अडचणीत आले. त्यांनी शितोळे यांच्याकडे जाऊन विक्री झालेल्या कांद्याचे पैसे मागितले असता या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. कांद्यासह 18 लाख रुपयांचा भुर्दंड झाल्याने दुबईत विकलेल्या कांद्याची तक्रार यवत पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Back to top button