पिंपरी : ‘डिसफॅगिया’ मानसिक ताणाला कारणीभूत | पुढारी

पिंपरी : ‘डिसफॅगिया’ मानसिक ताणाला कारणीभूत

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : डिसफॅगिया म्हणजे अन्न गिळण्याचा आजार हा मानसिक ताणाला कारणीभूत ठरत आहे. या आजारात रुग्णाला अन्न गिळण्यास त्रास होत असल्याने त्यांना चारचौघात जेवण करताना अडचण जाणवते. त्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य हरवते. परिणामी, ही बाब मानसिक ताणाला कारणीभूत ठरत आहे. या आजारासाठी प्रामुख्याने व्हायरल इन्फेक्शन हे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.

शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या सर्दी, ताप, खोकला या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. एका रुग्णालयात सर्दी, ताप, खोकला या आजाराचे दररोज 40 ते 50 रुग्ण येत असतील तर त्याच्या तुलनेत डिसफॅगियाच्या रुग्णांचे प्रमाण निम्मे म्हणजे जवळपास 20 ते 25 रुग्ण इतके आढळत आहे.

आजाराचे स्वरुप आणि उपचार
घसा खवखवतो. अन्न गिळण्यासाठी त्रास होतो. कोरडा खोकला येतो. घसा लाल होतो. हा आजार होण्यासाठी प्रामुख्याने व्हायरल इन्फेक्शन हे प्रमुख कारण आहे. तसेच, हा त्रास औषधोपचार करूनदेखील बरेच दिवस राहू शकतो. डिसफॅगियाच्या रुग्णांचे अचूक निदान आणि त्यांच्यावर प्रभावी औषधोपचार आवश्यक ठरतो. रुग्णाला अन्नपदार्थ सुरक्षितपणे गिळता यावे, यासाठी विविध प्रकारचे व्यायाम सुचविले जातात. तसेच, अन्नपदार्थांमध्ये बदल केला जातो.

डिसफॅगिया म्हणजे काय?
डिसफॅगिया म्हणजे अन्न गिळण्याचा आजार. या आजाराच्या रुग्णाला अन्नपदार्थ चावताना किंवा गिळताना समस्या निर्माण होतात. बिस्किटासारखा घन किंवा ज्यूससारखा द्रवपदार्थ खाता येत नाही.

नेमके काय होते?
डिसफॅगियामुळे चावलेले पदार्थ अन्ननलिकेत जाण्याऐवजी श्वासनलिकेत जातात. त्यातून रुग्णाला अचानक ठसका लागतो. तसेच श्वास घ्यायला त्रास होतो. सगळ्यांबरोबर जेवण करता येत नाही. त्यामुळे दुरावा निर्माण होतो. या प्रकारचे रुग्ण कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्य गमावतात. त्याचा दूरगामी परिणाम त्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेवर होतो.

डिसफॅगियाचा आजार झालेल्या रुग्णांना आपल्याला विविध आजार झाल्याची अकारण भीती वाटत राहते. त्यातून त्यांचा मानसिक ताण वाढत जातो. त्यांच्या आवश्यक वैद्यकीय तपासण्या करून औषधोपचार करायला हवे. घशाची सूज कमी होणारी औषधे, आम्ल, पित्त कमी करणारी औषधे आणि ज्यांना अ‍ॅलर्जीचा त्रास होतो, त्यांना त्यावरील औषधे द्यावी लागतात. सध्या बाह्यरुग्ण विभागात या आजाराचे जवळपास निम्मे रुग्ण आढळत आहेत.

                  – डॉ. अविनाश वाचासुंदर, कान-नाक-घसा तज्ज्ञ.

Back to top button