राज्यातील 1 लाख 72 हजार हेक्टर शेतीचे गारपिटीने नुकसान | पुढारी

राज्यातील 1 लाख 72 हजार हेक्टर शेतीचे गारपिटीने नुकसान

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेती आणि फळपिकांच्या नुकसानीचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. 19 मार्चअखरेच्या ताज्या अहवालानुसार सुमारे 1 लाख 72 हजार 327 हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका बसून शेतकरी अडचणीत आला आहे. नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, लातूर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांना सर्वाधिक तडाखा. आंबा, काजू, केळी, द्राक्ष, पपई, स्ट्रॉबेरी, मोसंबी, संत्रा, भाजीपाला, कांदा, गहू, हरभरा, मका, ज्वारी पिकांचे नुकसान झालेले आहे. नव्याने 1 लाख 33 हजार 721 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कृषी विभागाच्या नुकसान झालेल्या पिकांच्या नजर अंदाजित आकडेवारीच्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आलेली आहे.

राज्यात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे होणार्‍या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे संयुक्त काम महसूल, कृषी आणि ग्रामविकास अधिकार्‍यांमार्फत सुरू आहे. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांच्या सहीचा संयुक्त अहवाल कृषी आयुक्तालयात प्राप्त होत आहेत. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे अहवाल मिळतील आणि पुढील कार्यवाहीसाठी मंत्रालयात मदत व पुनर्वसन विभागाकडे अंतिम निर्णयासाठी पाठविण्यात येतील.
– विकास पाटील, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषी आयुक्तालय पुणे

नुकसानभरपाईची निकषानुसार नेमकी किती मदत?
पिकांच्या नुकसानीसाठी केंद्र सरकारकडून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरआफ) नियमांप्रमाणे सध्या हेक्टरी जिरायत पिकांसाठी 6 हजार 800, बागायती पिकांसाठी 13 हजार 500 आणि फळपिकांसाठी 18 हजार रुपयांइतकी मदत शेतकर्‍यांना दिली जाते. त्यानुसार नुकसानीचे अंतिम अहवाल झाल्यानंतरच शेतकर्‍यांना प्रत्यक्षात मदत मिळण्याची अपेक्षा असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button