पुणे : सदनिकेच्या आमिषाने 65 लाखांचा गंडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दिल्लीत सदनिका मिळवून देण्याच्या आमिषाने एकाला 65 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गौरव शत्रुघ्न सिंग (रा. यशवंतनगर, निंबोडी, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एकाने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिंग आणि तक्रारदाराची ओळख झाली होती.
दिल्लीतील केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागात नोकरीस असल्याची बतावणी केली होती. दिल्ली विकास प्राधिकरणाकडून सदनिका मंजूर झाली आहे. सदनिकेची किंमत 40 लाख रुपये आहे. सदनिका खरेदीत पैसे गुंतवल्यास चांगला फायदा होईल, असे आमिष सिंगने तक्रारदाराला दाखविले होते. सदनिकेचा ताबा मिळाल्यानंतर सदनिकेची विक्री करून नफा वाटून घेऊ, असे सांगून सिंग याने तक्रारदाराकडून वेळोवेळी 65 लाख 22 हजार रुपये घेतले. आरोपीने तक्रारदाराला बनावट कागदपत्रे पाठविली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार केली.