पुणे : कोर्टातील पार्किंग सुरू करण्यास मंजुरी | पुढारी

पुणे : कोर्टातील पार्किंग सुरू करण्यास मंजुरी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोरील कौटुंबिक इमारतीतील पार्किंग सुरू करण्यास अखेर उच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. संबंधित पार्किंग ’पे-अँड-पार्क’ स्वरूपात दरमहा 10 हजार रुपये भाडेतत्त्वावर सुरू करण्यास उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. तब्बल साडेपाच वर्षांनंतर कौटुंबिक न्यायालयातील पार्किंग येत्या काही दिवसांत सुरू होणार असल्याने वकिलांनी समाधान व्यक्त केले आहे. मेट्रोचे सुरू असलेले काम, शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या नव्या इमारतीचे बांधकाम, यामुळे जिल्हा न्यायालयातील पार्किंगची समस्या गेल्या काही दिवसांपासून अधिक गंभीर बनली होती.

वाहने लावण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने वकील, पक्षकारांना दुचाकी पार्किंगसाठी जागा शोधताना वणवण करावी लागत होती. जिल्हा न्यायालयातील चार नंबरच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या रस्त्यावर गाड्या पार्क करण्याची वेळ वकील, पक्षकारांवर आली होती.
पार्किंगच्या समस्येचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कौटुंबिक न्यायालय येथील बेसमेंटमधील पार्किंग 10 हजार रुपये भाडेतत्त्वावर सुरू करण्यासाठी दी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. वैशाली चांदणे यांनी 22 जुलै 2022 रोजी सुधारित प्रस्ताव मुंबई उच्च न्यायालयाला पाठविला होता. त्यावर उच्च न्यायालयाने 23 मार्च 2023 रोजी कौटुंबिक न्यायालयाला पत्राद्वारे पार्किंग सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून कौटुंबिक न्यायालयातील पार्किंगचा प्रश्न प्रलंबित होता. मात्र, उच्च न्यायालयाने पार्किंग सुरू करण्यास परवानगी दिल्याने लवकरच हे पार्किंग वकील, पक्षकारांसाठी खुले करण्यात येणार आहे. कौटुंबिक न्यायालयातील पार्किंग सुरू झाल्यावर जिल्हा न्यायालय आवारातील वाहने पार्किंगसह वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
            – अ‍ॅड. वैशाली चांदणे, अध्यक्षा, दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन

Back to top button