समान पाणीपुरवठा योजना वर्षभरात पूर्ण होणार ; पुणे महापालिका आयुक्तांचा विश्वास | पुढारी

समान पाणीपुरवठा योजना वर्षभरात पूर्ण होणार ; पुणे महापालिका आयुक्तांचा विश्वास

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणेकरांसाठी महत्त्वाची असलेली समान पाणीपुरवठा योजना आणि पंतप्रधान आवास योजना वर्षभरात पूर्ण करण्यात येणार असून, जायका आणि नदी सुशोभीकरण प्रकल्पांचे काम पुढे जाईल, असा विश्वास महापालिका प्रशासक तथा आयुक्त विक्रम कुमार यांनी व्यक्त केला. 2023-24 या आर्थिक वर्षाचे महापालिकेचे अंदाजपत्रक सादर केल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विक्रम कुमार बोलत होते. ते म्हणाले, समान पाणीपुरवठा योजना, पंतप्रधान आवास योजना हे दोन हाती घेतलेले महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यास आमचे प्राधान्य राहणार आहे. तसेच नदी पुनर्जीवन प्रकल्प आणि नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी
अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्यात आली आहे.

समाविष्ट गावांमधील सांडपाणी व मैलापाणी व्यवस्थापनासाठी 400 कोटी रुपयांचे कर्जरोखे घेतले जाणार आहेत. 2019 पासून नव्याने करआकारणी झालेल्या मिळकतींकडून 100 टक्के करआकारणी केली जात आहे. उर्वरीत जुन्या मिळकतींना केवळ नोटिसा पाठविल्या आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा अंतिम निर्णय आल्यानंतर सुधारित बिले पाठविण्यात येतील. तसेच समाविष्ट केलेल्या गावांमधून पाच वर्षात 20-40-60-80 टक्के अशा दराने पहिली चार वर्षे आणि पाचव्या वर्षी 100 टक्के करआकारणी होणार असल्याने कराचे उत्पन्न वाढणार आहे. समाविष्ट गावांतील बांधकाम परवानग्या सध्या पीएमआरडीएकडे आहेत. पुढील वर्षी हे अधिकार महापालिकेकडे येणार आहेत. तसेच या गावांतील बांधकाम परवानगीतून मिळालेले 75 टक्के उत्पन्न महापालिकेला मिळणार आहे. त्यामुळे पालिकेचे उत्पन्न वाढणार असल्याचा दावाही आयुक्तांनी केला.

Back to top button