राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकले पालकमंत्री, भाजपच्या आभारामुळे एकच चर्चा | पुढारी

राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकले पालकमंत्री, भाजपच्या आभारामुळे एकच चर्चा

इंदापूर, पुढारी वृत्तसेवा: इंदापूर शहरात चौका चौकात राष्ट्रवादी काँग्रेस कडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार ,खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्ष नेते अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या बरोबरीने भाजपचे नेते आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचाही फोटो झळकवण्यात आला आहे. या फोटोमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.

इंदापूर शहरातील विकास कामांसाठी नगरोत्थान योजना व दलित वस्ती योजनेतून 15 कोटी 46 लाख 99 हजार रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसकडून चंद्रकांत पाटील यांचा फोटो टाकून चौकात चौकात बॅनर लावत जाहीर आभार मानण्यात आले आहेत .या बॅनरवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे देखील फोटो आहेत. हे बॅनर शहरातील प्रमुख चौका चौकात लावल्याने शहरातील लोकांबरोबर बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांचेही लक्ष वेधून घेत आहेत.

इंदापूर शहरात आणलेल्या विकास निधीवरुन राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे व भाजपाचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू असून आता चक्क राष्ट्रवादी काँग्रेसने एक पाउल पुढे टाकत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभाराचे बँनर लावल्याने याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे.

 

Back to top button