पुण्यातील कोंढव्यात हाताचा पंजा तोडल्याच्या रागातून 14 वाहनांची तोडफोड

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणात एका मुलाचा हाताचा धारदार शस्त्राने पंजा तोडला गेला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी कोंढवा परिसरातील टिळेकरनगर येथे रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी, टेम्पो, रिक्षा अशी एकूण 14 वाहनांची तोडफोड केली.
सुशील दादा दळवी (वय 20), ऋषिकेश शंकर गोरे (20) आणि प्रविण शिवाजी भोसले (18, सर्व रा.कोंढवा,पुणे) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी संजीवकुमार हनुमंत धनी (वय 49, रा. कोंढवा, पुणे) यांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार कोंढवा परिसरातील टिळेकरनगरमध्ये 22 मार्च रोजी रात्री पावणेअकरा वाजता घडली.
कात्रज परिसरात लाडप्पा याच्यावर एका टोळक्याने हल्ला करुन त्याचा खुनाचा प्रयत्न केला होता. या घटनेत त्याच्या हातावर वार झाल्याने त्याचा पंजा मनगटापासून तुटला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याच्या साथीदारांनी कोंढवा परिसरातील टिळेकनगर येथे रस्त्यावरील चार दुचाकी वाहनावर दहा ते 12 जणांनी हातात तलवारी, कोयते घेऊन दहशत माजवत आणि आरडाओरड करत धिंगाणा सुरु केला. त्यांनी रस्त्यावरील तक्रारदार यांची डस्टर गाडी, वेगनर गाडीच्या काचा फोडून नुकसान केले. त्यानंतर सहा चारचाकी, तीन दुचाकी, तीन टेम्पो, एक रिक्षा, एक छोटा हत्ती अशा 14 गाडयांच्या काचा फोडून नुकसान केलेे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक एस उसगावकर पुढील तपास करत आहे.