कार्ला यात्रेनिमित्त पोलिस अधीक्षकांनी केली पाहणी | पुढारी

कार्ला यात्रेनिमित्त पोलिस अधीक्षकांनी केली पाहणी

कार्ला : संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी व आगरीबांधवांचे कुलदैवत असणार्‍या एकवीरा देवीची चैत्रीयात्रेची जय्यत तयारी सुरू असून पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी एकवीरादेवी मंदिर परिसराची पाहणी करत उपाययोजनाबाबत सूचना दिल्या.
सदर यात्रा सोमवार, दिनांक 27 ते 29 मार्चदरम्यान चालणार असून चैत्र शुध्द षष्टीला माहेरघरी (देवघर) दि. 27 सोमवारी संध्याकाळी आठ वाजता ‘बहिरी देवाचा’ पालखी सोहळा, तर मंगळवारी, 28 मार्च चैत्रशुध्द सप्तमीला सायंकाळी सात वाजता मुख्य यात्रा म्हणजे श्री आई एकवीरादेवीचा पालखी सोहळा वाजत गाजत मांगल्यपूर्ण वातावरणात होणार आहे.

या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था कशा प्रकारे ठेवली जाणार आहे, याबाबत पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी पार्किंग व्यवस्था, दर्शन लाईन, पाच पायरी मंदिर, पायथा मंदिर, पालखी मिरवणूक मार्ग, पाय-यांची दुकानाची पाहणी करत योग्य उपाययोजना करण्यासाठी सूचना दिल्या. या वेळी लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक, लोणवळा ग्रामीण पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक निरीक्षक भोसले, वनविभागाचे प्रमोद रासकर, गणेश धुळशेट्टे, मंदिर व्यवस्थापक मंगेश गायकवाड, पोलिस हवालदार नीलेश कवडे, गणेश होळकर, विजय मुंडे, पोलिस पाटील अनिल पडवळ यांंच्यासह पोलिस प्रशासन उपस्थित होते.

यात्रेदरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मावळ प्रशासन सज्ज झाले आहे. या वेळी यात्रेदरम्यान गड व परिसरात वेहेरगाव, कार्ला, मळवली याठिकाणी चार दिवस दारूबंदी तर यात्रेच्या मुख्य दिवशी लोणावळा शहरात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. कार्ला फाटा या ठिकाणी प्रत्येक वाहनाची तपासणी करून गडावर दारू जाणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे; तसेच चोवीस तास अखंडित वीजपुरवठा ठेवण्यात येणार आहे. यासाठी कायदा प्रशासन सज्ज झाले आहे.

फटाके वाजवण्यावर बंदी
फटाके वाजवण्यावर बंदी, पशुहत्या बंदी करण्यात येणार आहे. अग्निशामक बंबाची व्यवस्था करण्यात येणार आहे. नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून, या ठिकाणी शासकीय विभागाचे एक एक अधिकरी आपत्कालीन व्यवस्थापनसाठी त्यामध्ये उपलब्ध राहणार आहे; तसेच कर्मचारी तत्काळ संपर्कासाठी इंटरकॉम सेवा, सीसीटीव्ही कॅमेरे, क्लोजसर्किट टीव्ही, डॉक्टरांचे सेवापथक, पायर्‍या दुरुस्ती, सुलभ शौचालयात पाण्याची व्यवस्था, पार्किंगच्या राखीव जागा, भक्तांसाठी रेलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

Back to top button