पिंपरी : स्टुडंट पोर्टल साईट संथ मुख्याध्यापक त्रस्त | पुढारी

पिंपरी : स्टुडंट पोर्टल साईट संथ मुख्याध्यापक त्रस्त

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : गेल्या कित्येक दिवसांपासून शालेय स्टुडंट पोर्टल ही साईट संथगतीने सुरू असल्याचा परिणाम कामावर होत आहे. रात्रंदिवस बसूनसुद्धा कोणतेही काम होत नसल्याने व एकावेळी एकच लॉगिन होत असल्याने साईटवर काम करणारे कर्मचारी व सर्व मुख्याध्यापक त्रस्त झाले आहेत. या साईटवर सर्व शाळांना विद्यार्थ्यांचे आधार वैधता तपासायची असून, या प्रमाणतेवर कित्येक शाळांचे अनुदान व संचमान्यता अवलंबून आहे. या आधीही काही दिवस ही साईट बंद होती. त्यानंतर सुरू झाली.

परंतु, अतिशय संथ गतीने सुरू असल्याने पुन्हा पुन्हा लॉगिन करावे लागत आहे. यासाठी 10 मिनिटे प्रत्येक वेळी द्यावा लागत असल्याने शाळांचा या साईटवर काम करण्यास खूप वेळ वाया जात आहे.  त्यातच वरिष्ठ अधिकार्‍यांकडून त्वरित काम पूर्ण करण्याचे आदेश येत आहेत. त्यामुळे याचा परिणाम मुख्याध्यापकांच्या मानसिक स्वास्थावर होत आहे. तरी वरिष्ठांनी आधी साईट अद्ययावत करून मुख्याध्यापकांना काम करण्यास थोडा अवधी द्यावा, अशी मागणी मुख्याध्यापक करीत आहेत. आता साईट दुरुस्ती कधी होणार, याकडे मुख्याध्यापकांचे लक्ष लागले आहे.

साईट इतकी संथ चालते की, एका विद्यार्थ्याच्या आधारकार्डची वैधता तपासण्यास अर्धा ते पाऊण तास लागत आहे. आमच्यासाठी हे खूप त्रासदायक ठरत आहे. विद्यार्थी शाळेत आहेत; पण केवळ आधारकार्ड वैधता तपासणी नसल्याने संचमान्यतेमध्ये ग्राह्य धरले जाणार नाही. त्यामुळे शाळेत पटसंख्या असूनही शिक्षक कमी केले जातील.

                 -प्राचार्या साधना दातीर, अध्यक्षा पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघ

Back to top button