कृष्णानगर येथे रायफल शूटिंग प्रशिक्षण केंद्र | पुढारी

कृष्णानगर येथे रायफल शूटिंग प्रशिक्षण केंद्र

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रिकेट, टेनिस, हॉकी, कुस्ती, रोईग, धनुर्विद्या या खेळांचे प्रशिक्षण केंद्र सुरू केल्यानंतर आता, राष्ट्रीय रायफल व पिस्तूल नेमबाजी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे केंद्र कृष्णानगर, चिंचवड येथील स्वामी विवेकानंद क्रीडांगणातील बॅडमिंटन हॉलच्या तळमजल्यावर असणार आहे. पालिकेने ठरवून दिलेल्या दराने खेळाडूकडून शुल्क आकारले जाणार आहे. मात्र, एकूण प्रशिक्षणार्थीपैकी महापालिका शाळेतील 40 टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे केंद्र आकुर्डी येथील अरुण पाडुळे स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशन चालविणार आहे.

त्यासंदर्भात पालिकेसोबत 10 वर्षांचा करार करण्यात येणार आहे. पालिकेने ठरवून दिलेले शुल्क खेळाडूंकडून फाउंडेशनला घेता येणार आहे. एकूण 60 टक्के प्रशिक्षणार्थी खेळाडूंना शुल्क आकारता येणार आहे. पालिका शाळेतील विद्यार्थी-खेळाडूंना मोफत प्रशिक्षण देणे बंधनकारक आहे.

पालिका शाळेच्या विद्यार्थ्यांची निवड करून 14, 17 व 19 वर्षांखालील मुले व मुलींचे गट बनवून प्रशिक्षण दिले जाणार आहे. ती संख्या एकूण प्रशिणार्थींच्या 40 टक्के असणार आहे. या प्रशिक्षण केंद्रातून राष्ट्रीयस्तराचे खेळाडू निर्माण करण्याचा उद्देश आहे.
प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी फाउंडेशनसोबत 10 वर्षांचा करार करण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच केंद्र सुरू केले जाईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

शहरात राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याचा प्रयत्न
महापालिका शाळेतील विद्यार्थी-खेळाडूंना विविध खेळांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे म्हणून पालिका विविध ठिकाणी प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहेत. रायफल व पिस्तुल शूटींगचे प्रशिक्षण देण्यासाठी कृष्णानगर येथे केंद्र सुरू करण्यात आले आहे. करारनामा झाल्यानंतर लवकरच पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसह शहरातील खेळाडूंना तेथे प्रशिक्षण दिले जाईल. त्या माध्यमातून शहरातील अनेक राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होतील, असे महापालिकेच्या क्रीडा विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.

Back to top button