पुणे : महिला बचत गटांच्या प्रदर्शनात अडीच लाखांची मालविक्री

पुणे : पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेतील लाभार्थी व महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या प्रक्रियायुक्त विविध उत्पादनाच्या सुमारे 30 स्टॉलवर एक दिवसीय प्रदर्शनात सुमारे एक हजार ग्राहकांनी भेटी दिल्या. त्यातून एकाच दिवसात सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांची विक्री झाली. साखर संकुलसारखाच प्रदर्शनाचा कार्यक्रम इतरत्र राबविल्यास खर्या अर्थाने उत्पादनांची बाजारपेठ विस्तारेल असे मत महिला बचत गटांकडून व्यक्त करण्यात आले.
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या पुढाकाराने (एमसीडीसी) अन्न प्रक्रिया योजनेतील लाभार्थ्यांकडून उत्पादित वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या बाबत साखर आयुक्तालयात आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन साखर आयुक्त शेखर गायकवाड व वंदना शेखर गायकवाड यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले होते. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे यांनी सर्वांचे स्वागत करीत प्रदर्शनामागची भुमिका सांगितली. यावेळी साखर संचालक (अथर्र्) यशवंत गिरी साखर सह संचालक (उपपदार्थ) संतोष पाटील, राजेश सुरवसे (अथर्र्) व अन्य अधिकारी उपस्थित होते.
महिला बचत गटांनी तयार केलेले फळे व भाजीपाला, शाही पान मुखवास, लोणचे, लाकडी तेलघाण्यावरील खाद्यतेल, बिस्किट, आटा, तांदूळ, खाकरा, पापड, मसाले, चकली, थालीपीठ, ड्रायफ्रुट, ताजा भाजीपाला, लाडू, दुग्धजन्य पदार्थ, शेवया, सांडगे,आंबे, आईस्क्रिम, शेंगदाणा चटणी व चिक्की, अगरबत्ती, बेकरी उत्पादने, डाळी, सॉस, नाचणीयुक्त पदार्थांसह एकूण 35 ते 40 उत्पादने विक्रीस उपलब्ध होती. सायंकाळपर्यंत काही स्टॉलवरील संपुर्ण पदार्थांची तर काही स्टॉलवरील ऐंशी टक्के मालाची विक्री पूर्ण झाल्याची माहिती मिलिंद आकरे यांनी दिली.