पुणे : ऊसतोडणी कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष | पुढारी

पुणे : ऊसतोडणी कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : सोमेश्वर कारखान्याच्या मुख्य गेटवर झालेल्या अपघातात नुकताच एका ऊसतोडणी महिलेला आपला जीव गमवावा लागला. अपघातासारखी गंभीर घटना घडूनही सोमेश्वर कारखाना प्रशासन आणि वडगाव निंबाळकर पोलिसांनी या घटनेचा स्थानिकांना तपास लागू दिला नाही. याबाबत जाणीवपूर्वक गुप्तता पाळण्यात आली. यावरून ऊसतोडणी कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. ऊसतोड कामगार पोटासाठी सहा महिने कारखाना कार्यस्थळावर हमालाप्रमाणे ऊसतोडीचे काम करत असतात; मात्र त्यांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी प्रशासन घेताना दिसत नाही.

अगोदरच ऊस वाहतूक करणारी वाहने कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. अल्पवयीन मुलांकडून ट्रॅक्टर व ट्रक चालविले जातात. यावर कोणत्याही यंत्रणेचे नियंत्रण नाही. वशिल्याने वाहने अपुर्‍या कागदपत्रांशिवाय रस्त्यावर धावतात; मात्र गंभीर अपघात झाल्यानंतर संबंधित कुटुंबाला साधा विम्याचा आधारदेखील मिळत नाही.

सोमेश्वर कारखाना येथे नुकत्याच झालेल्या अपघातात पाटोदा येथील अनिता रमेश नेमाने या अतिशय गरीब कुटुंबातील महिलेचा मृत्यू झाला. या अपघाताला जबाबदार कोण ? असा सवाल यानिमित्ताने ऊसतोडणी कामगार विचारत आहेत. पोलिसांनी याबाबत मौन धारण केले आहे. वास्तविक वडगाव पोलिसांनी तातडीने याबाबत गुन्हा दाखल करणे गरजेचे होते; मात्र नेहमीच वेगवेगळी कारणे सांगणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांनीही या घटनेकडे गांभीर्याने पाहिले नाही. यात प्रशासन नक्की कोणाला वाचवायचा प्रयत्न करत आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.

रस्तासुरक्षा सप्ताह केवळ नावापुरता
दरवर्षी जानेवारी महिन्यात राज्यभरात रस्तासुरक्षा सप्ताह राबविला जातो. यामध्ये सुरक्षित वाहतुकीचे नियम वाहनचालकांना सांगितले जातात. मात्र, यावर्षी हा सुरक्षा सप्ताह राबविला नाही. पर्यायाने दरवर्षी नवीन येणारे वाहनचालक वाहतूक नियमांबाबत अनभिज्ञ असल्याचे चित्र गाळप हंगामात पहायला मिळत आहे. गाळप हंगामात रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मात्र, याबाबत पोलिस आणि आरटीओ प्रशासनाला गांभीर्य नाही.

Back to top button