पुणे : किकवी उड्डाणपुलाचे काम वेगात | पुढारी

पुणे : किकवी उड्डाणपुलाचे काम वेगात

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा :  पुणे – सातारा महामार्गावरील किकवी (ता. भोर) येथे उड्डाणपूल नसल्याने किकवीसह परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी मोठे आंदोलन केले. त्याची दखल घेत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मंजुरी उड्डाणपुलाच्या कामास मान्यता दिली. महामार्ग प्राधिकरणाच्या ठेकेदाराकडून येथील उड्डाणपुलाचे काम वेगात सुरू आहे. किकवी येथे भुयारीमार्ग मंजूर करण्यात आला होता. मात्र, पुन्हा सर्वेक्षण केल्यानंतर या ठिकाणी 12 मीटर रुंद व 5 मीटर उंचीचा उड्डाणपूल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मंजूर केला. उड्डाणपुलाच्या कामाला गेल्या काही दिवसांपासून प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.

माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांच्या नेतृत्वाखाली किकवी येथे 4 फेब्रुवारी रोजी आंदोलन झाले होते. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार अंडरपासचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवल्याचे सांगितले होते. मात्र, या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा, अशी नागरिकांची मागणी होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत पाठपुरावा केला. त्यास यश येऊन किकवी येथे 9 कोटी 73 लाख रुपये किंमतीच्या उड्डाणपुलाबरोबरच हरिश्चंद्री येथे 17 कोटी 53 लाख रुपयांच्या दोन लेनच्या कामास मंजुरी देण्यात आली.

धोकादायकरित्या महामार्ग पार करताना अपघातात अनेक ग्रामस्थांचे प्राण गेले. किकवीसह महामार्गावरील इतर ठिकाणी उड्डाणपुलाच्या कामास मंजुरी मिळाली आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचे पंचक्रोशीच्या ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो. उड्डाणपुलामुळे नागरिकांना सुरक्षितरित्या महामार्ग पार करता येईल.
                                               – चंद्रकांत बाठे, माजी जिल्हा परिषद सदस्य

 

Back to top button