पवित्र रमजानला आजपासून सुरुवात | पुढारी

पवित्र रमजानला आजपासून सुरुवात

पुणे :  पुढारी वृत्तसेवा :  मुस्लिम धर्मीयांचा पवित्र रमजान महिना शुक्रवारपासून (दि.24) सुरू होत असून, यानिमित्ताने पुण्याच्या सीरत कमिटीतर्फे सर्व मुस्लिम समाजबांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. घरोघरी रमजाननिमित्ताने खास तयारी करण्यात आली असून, मुस्लिम बांधवांमध्ये उत्साह, आनंदाची लहर पाहायला मिळत आहे. मुस्लिम समाज बांधवांमध्ये ’रमजान’ महिन्याला विशेष महत्त्व आहे. याला ’ बरकती’ महिना असेही म्हटले जाते. मनातील दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव, सद्भावना वाढविणारा, संयम, त्याग, शांती, सहिष्णुता याची शिकवण देणारा, हा महिना आहे.

संपूर्ण महिनाभर अत्यंत कडकडीत रोजे (उपवास), पाच वेळा नियमितपणे नमाज पठण केले जाते. गुरुवारी रात्री (दि.23) चंद्रदर्शन झाल्यानंतर शुक्रवारपासून (दि.24) रमजानच्या पवित्र महिन्याला प्रारंभ होत आहे. सीरत कमिटीची बुधवारी (दि.22) बैठक झाली. बैठकीला मौलाना गुलाम अहमद खान आणि मौलाना निजामुद्दीन फकरुद्दीन शेख आदींची उपस्थिती होती. सीरत कमिटीचे सचिव रफिउद्दीन शेख म्हणाले, की बुधवारी सीरत कमिटीची बैठक झाली. संपूर्ण भारतात चंद्रदर्शन झाले नाही. त्यामुळे बैठकीत झालेल्या निर्णयानुसार गुरुवारी (दि.23) चंद्रदर्शन झाल्यावर शुक्रवारपासून (दि.24) पहिला रोजा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण भारतातदेखील शुक्रवारी (दि.24) रमजानला सुरू होत आहे.

सेहरी, रोजा इफ्तारसाठी खाद्यपदार्थांची खरेदी सुरू

किमिया, कलमी, अजवा….असे विविध प्रकारचे खजूर….बनारस आणि मालेगाव येथून आलेल्या खास शेवया….विविध प्रकारचे सरबत…काजू, बदाम…असा विविध प्रकारचा सुकामेवा…सध्या अशा खाद्यपदार्थांच्या खरेदीसाठी मुस्लीम समाजबांधवांची लगबग सुरू असून, सेहरी आणि रोजा इफ्तारसाठी खजुरापासून ते सुकामेव्याच्या खरेदीसाठी स्टॉल्सवर गर्दी होत आहे.
सौदी अरेबिया, इराक आणि इराण आदी देशांमधून येणार्‍या खजूरच्या किमतीत 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली असली तरीही समाजबांधवांकडून खजूर मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहे. यंदा सेहरी आणि रोजा इफ्तारसाठी खजूर ते शेवयांपर्यंतच्या पदार्थांची खरेदी होत असून, त्यासोबतच सरबत, रोझ सिरप, विविध प्रकारची फळेही उपबल्ध आहेत. पण, काही खाद्यपदार्थांच्या किमतीत 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कलिंगड, खरबूज, पपईला मागणी

इफ्तारसाठी कलिंगड, खरबूज, पपईच्या खरेदीसाठी बाजारात मुस्लिम बांधव गर्दी करू लागले आहेत. बाजारात पुणे विभागातून फळे दाखल होत असून, मागणीही चांगली आहे. बाजारात या फळांच्या एका नगाची 40 ते 80 रुपयांपर्यंत विक्री करण्यात येत आहे.
रमजानचा महिना सुरू झाल्यानंतर रोजे सोडतेवेळी कलिंगड, खरबूज व पपई आदी फळांचा हमखास समावेश केला जातो. त्यामुळे, घरगुतीसह इफ्तार पार्ट्यांचे आयोजन करणार्‍या आयोजकांकडून या फळांना रमजान महिन्यात मोठी मागणी राहते. त्यापार्श्वभूमीवर, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात पुणे विभागातून या फळांची मोठ्या प्रमाणात आवक होऊ लागली आहे.

रमजानच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून बाजारात कलिंगड, खरबूजासह पपईची आवक वाढली आहे. त्याला मागणीही चांगली असून, त्याच्या दरात किलोमागे एक ते दोन रुपयांनी वाढ झाली आहे. उन्हाचा कडाका कायम असून, त्यामुळेही या फळांना मागणी आहे. महिनाभर या फळांचे तेजीतील दर टिकून राहतील.

Back to top button