पुणे : खोदकामामुळे शहरातील रस्त्यांची लचकेतोड ! | पुढारी

पुणे : खोदकामामुळे शहरातील रस्त्यांची लचकेतोड !

पुणे :  पुढारी वृत्तसेवा : महापालिकेकडून उपनगरांत ड्रेनेजलाईन, पावसाळी वाहिन्या व जलवाहिन्या टाकण्याची कामे सुरू आहेत. काही भागांत विद्युत व गॅस वाहिन्याही टाकण्यात येत आहेत. या कामांसाठी ठिकठिकाणी खोदाई करण्यात आल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. परिणामी, विविध भागात होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व नागरिक त्रस्त झाले आहेत. विकासकामे तर होणे गरजेचे असून, ही कामे वेळत पूर्ण करून रस्त्यांची दुरुस्ती तातडीने केली जाण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

खोदाईमुळे वाहतूक कोंडी

वडगाव शेरी : नगर रस्ता, कल्याणीनगर, विमाननगर, वडगाव शेरी परिसरात विविध विकासकामांसाठी महापालिकेने रस्त्यांची खोदाई सुरू केली आहे. यामुळे या भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.कल्याणीनगरमध्ये पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचत होते, यामुळे या ठिकाणी सध्या पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम सुरू आहे. कल्याणीनगर जॉगर्स पार्क येथे रस्त्याच्या मध्यभागी काम सुरू असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. विमाननगरमध्ये ड्रेनेजच्या कामासाठी रस्ते खोदाई सुरू आहे. या कामासाठी वापरल्या जाणार्‍या पाईपांचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
वडगाव शेरीतील जुना मुंढवा रस्त्यावरदेखील ड्रेनेजचे काम सुरू आहे. गणेशनगर येथील ड्रेनेजची लाईन जुनी झाल्याने नवीन वाहिनी टाकली जात आहे. नगररस्त्यावर समान पाणीपुरवठा योजना आणि पावसाळी वाहिन्यांच्या कामासाठी खोदाई सुरू आहे, यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होत आहे.

पासवाळ्यामध्ये ठिकठिकाणी पाणी तुंबण्याची समस्या उद्भवली होती. यामुळे परिसरात पावसाळी वाहिन्या व सांडपाणी वाहिन्यांची कामे सुरू केली आहेत. हे काम पूर्ण झाल्यावर भविष्यात पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होणार नाही. पुढील दोन महिने ही कामे सुरू राहणार असून, नागरिकांनी सहकार्य करावे.
                               -सिध्दराम पाटील, अधिकारी, ड्रेनेज विभाग, महापालिका 

बिबवेवाडीत रस्त्याचे काम 2 वर्षांपासून सुरू

बिबवेवाडीतील स्वामी विवेकानंद रस्त्यावर सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम दोन वर्षांपासून काम आहे. ते संथगतीने होत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बिबवेवाडीतील सीताराम आबाजी बिबवे या महापालिकेच्या शाळेसमोर व शोभा सवेरा सहकारी गृहरचना सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर गेल्या दोन महिन्यांपासून रस्ते खोदाई केली आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे.

त्यामुळे विद्यार्थी, पालक, वाहनचालक व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सोसायटीतील रहिवाशी रस्त्याच्या खोदाईमुळे त्रस्त
झाले आहेत. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभारी सहायक आयुक्त प्रकाश पवार म्हणाले की, बिबवेवाडी परिसरात महापालिकेच्या मुख्य खात्याकडून विविध विकासकामे सुरू आहेत. रस्ते खोदाईमुळे होणारी नागरिकांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न
केला जाईल.

धायरी, खडकवासला भागात खोदाईमुळे वाढले अपघात

धायरी, सिंहगड रोडसह खडकवासला परिसरात रस्ते दुरुस्ती, भूमिगत वीजवाहिन्या व गॅसवाहिन्यांच्या कामांसाठी ठिकाणी केलेल्या खोदकामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहने घसरून अपघात वाढल्याने व वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. धायरी येथील गणेशनगर परिसरात भूमिगत वीज केबल, गॅसलाईन टाकण्यासाठी दीड महिन्यांपूर्वी रस्ते खोदण्यात आले. नांदेड ते सिंहगड, तसेच पानशेत या रस्त्यांचे काम गेल्या पाच वर्षांपासून संथगतीने सुरू आहे.

गोर्‍हे बुद्रुक, खडकवासला येथे काँक्रीटीकरणासाठी रस्ते खोदले आहेत. खडकवासल्यात कसेबसे काम सुरू झाले. मात्र, ‘रास्ता रोको’ आंदोलन करूनही गोर्‍हे बुद्रुक व इतर ठिकाणची कामे ठप्प आहेत. सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त प्रदीप आव्हाड म्हणाले, ‘सध्या डांबर प्लांट बंद असून, तो सुरू झाल्यावर खोदलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रस्त्यांवरील राडारोडाही उचलण्यात येईल.’

जमलंच तर रस्त्यांची दुरुस्तीही करा !

कर्वेनगर परिसरात भूमिगत वाहिनी टाकण्याचे काम अनेक ठिकाणी सुरू आहे. हे काम झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने रस्त्यांची डागडुजी करणे अपेक्षित आहे. परंतु, रस्त्यांची दुरुस्ती व्यवस्थित होत नसल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. विकासकामांसाठी खोदाई आवश्यकच आहे. मात्र, त्यानंतर रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. कर्वेनगर भागातील कॅनॉल रस्ता, शाहू कॉलनी परिसरात मागील आठवड्यामध्ये रस्त्यांची खोदाई करून वाहिनी टाकण्याचे काम करण्यात आले.

खाजगी मोबाईल कंपनीकडून खोदाई करून ही वाहिनी टाकण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, हे काम झाल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती व्यवस्थित केली नाही. परिणामी, रस्त्यांवर असमतोल निर्माण झाला आहे. खोदाई करताना निघालेले डांबर, पेव्हर ब्लॉक रस्त्यांच्या कडेला पडून आहेत. रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांना पायी चालणेदेखील अवघड झाले असून, वाहनचालकांना कसरतच करावी लागत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुनील कदम यांनी सांगितले.

वारज्यात रस्त्यावर चेंबरची दुरवस्था
वारजेतील स्व. रमेश वांजळे हायवे चौक येथून रामनगर व गावठाणाकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावर महापालिकेच्या वतीने सांडपाणी वाहिनी टाकण्यात आली आहे. गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या या कामात ठेकेदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहनचालक व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या रस्त्यावरील सांडपाणी वाहिनीचे काम पूर्ण होऊन जवळपास एक आठवडा उलटला, तरीही रस्त्यावरील राडारोडा व माती अद्यापही उचलण्यात आली नाही. यामुळे दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. या रस्त्यावर टाकलेले काही चेंबर रस्त्याच्या पातळीबरोबर, तर काही खाली गेले आहेत, यामुळे रस्त्यावर असमतोल निर्माण झाल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. तसेच टाकण्यात आलेल्या चेंबरची झाकणे नित्कृष्ट दर्जाची असल्याने ती अवघ्या आठवडाभरातच तुटू लागल्याचे नागरिकांनी सांगितले.

पावसाळ्यात वाहून येणारे पाणी येथील पुलाखाली साचत असल्याने या रस्त्यावर पावसाळी पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. दरम्यान, रामनगर व गावठाणकडे जाणारी वाहतूक बंद झाल्याने, तसेच ठेकेदाराकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या गेल्या गेल्या नसल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वारजे परिसरात प्रशासनामार्फत विकासकामे सुरू आहेत; परंतु ठेकेदारांच्या निष्काळजीपणा हे काम पूर्ण होण्यासाठी आणखीन किती कालावधी लागणार याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

केबलच्या अडथळ्यामुळे परिसरातील किरकोळ कामे बाकी आहेत. काम केलेल्या चेंबरवरून वाहने गेल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. असमांतर असलेल्या चेंबरची लवकरच दुरुस्ती केली जाईल. रस्त्यावरील माती व राडारोडा उचलण्याचे काम सुरू आहे.
                               -दीपक सोनवणे, शाखा अभियंता, मलनि:सारण विभाग,

धनकवडी परिसरामध्ये वाहनचालकांची कसरत

धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयातंर्गत सरहद शाळेसमोर काश्मिर मैत्री चौकात, भारती विद्यापीठ पोलिस चौकीच्या परिसरात, भारती विद्यापीठाच्या मागील प्रवेशद्वारासमोर आणि मोहननगर येथील शिवशंकर चौक ते लोकशाहीर रघुनाथ पासलकर चौकापर्यंत विविध कारणांसाठी रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे, यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
सिमेंटचा रस्ता करणे, पावसाळी वाहिन्या, सांडपाणी वाहिन्या व पदपथांच्या कामासाठी या भागात रस्ता खोदाई केली आहे. यामुळे नागरिकांना पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागत असल्याने इतर रस्त्यांवरील वाहतूक कोंडी होत आहे. परिसरातील ही कामे लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Back to top button