पुणे : बच्चे कंपनीने केला हवामान शास्त्रज्ञांवर प्रश्नांचा भडिमार | पुढारी

पुणे : बच्चे कंपनीने केला हवामान शास्त्रज्ञांवर प्रश्नांचा भडिमार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  काका पाऊस कसा पडतो तो मोजतात कसा..भूकंप नेमका कसा होतो. तुम्हाला आधी कळते का..असे अनेक प्रश्न विचारून शालेय विद्यार्थ्यांनी हवामान शास्त्रज्ञांवर प्रश्नांचा भडिमार केला. गुरुवारी दि.23 मार्च रोजी शिवाजीनगर भागातील सिमला हाऊस येथील पुणे वेधशाळेत जागतिक हवामान दिनानिमित्ताने प्रदर्शनाचे आयोजन केरण्यात आले होते. एरवी या विभागात फारसे कुणी येत नाही. मात्र, विज्ञान दिन व हवामानदिना निमित्ताने येथील शास्त्रज्ञ व कर्मचारी सर्व उपकरणांची माहिती सामान्य जनतेसाठी खुली करतात.

हवामानातील बदलांची माहिती देणारी अत्याधुनिक यंत्रे घेऊन अनेक स्टॅावर येथील शास्त्रज्ञ व कर्मचारी आबालवृध्दांना माहिती देत होते. पुणे वेधशाळेतील अतिरिक्त महासंचालक डॉ.कृष्णांनंद होसाळीकर व त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक आजी-आजोबा यांना माहिती देण्यात रमलेली होती. पाऊस कसा पडतो, भूकंप कशामुळे होतो, तो मोजतात कसा याचे प्रात्यक्षिक या ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू होते. या ठिकाणी हवामान विभागात नोकरी मिळवण्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे लागते,आधुनिक पर्जन्यमापक कसे असते, ऑटोमॅटिक वेदर स्टेशनवर नेमक्या नोंदी होतात कशा, याची माहिती दिली जात होती. विविध स्टॉलवर चित्रांसह यंत्रांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.

 

Back to top button