पुणे : वार करून तरुणाचा पंजा तोडला | पुढारी

पुणे : वार करून तरुणाचा पंजा तोडला

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पूर्ववैमनस्यातून टोळक्याने एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला. कोयत्याने त्याच्यावर वार करून त्याचा मनगटापासून पंजा तोडल्याचा धक्कादायक प्रकार कात्रज येथे भरदिवसा घडला. अखिलेश ऊर्फ लाडप्पा चंद्रकांत कलशेट्टी असे या तरुणाचे नाव आहे. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून त्याचा पंजा पुन्हा जोडला. या प्रकरणी अभिजित दुधनीकर (वय 23, रा. गोकूळनगर, कात्रज) याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी पाच जणांसह त्यांच्या साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना सुखसागर येथील पार्लरसमोर बुधवारी दुपारी साडेचार वाजता घडली. अधिक माहितीनुसार, आरोपी व त्याचे साथीदार हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्याविरुद्ध फिर्यादी यांनी पूर्वी तक्रार केली होती. फिर्यादी व लाडप्पा हे दुचाकीवरुन जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना वाटेत अडविले. तुम्ही केस करता का आमच्यावर, थांबा आता तुमचा मर्डरच करतो, असे म्हणून त्यांनी फिर्यादी यांना पकडून सपासप वार केले. फिर्यादी पळून जात असताना त्यांना पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लाडप्पा याच्यावर वार केला.

Back to top button