मोशी महामार्गावरील दुभाजक खुला करा | पुढारी

मोशी महामार्गावरील दुभाजक खुला करा

मोशी; पुढारी वृत्तसेवा : मोशीतील पुणे-नाशिक महामार्गावरून साईनाथ हॉस्पिटल व प्राधिकरणात जाण्यासाठी सोयीचे ठरू शकणारे दुभाजक परवानगीअभावी अद्याप खुले करण्यात आलेले नसून ते तातडीने खुले करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मोशी प्राधिकरण सेक्टर नं.4 व 6 येथे जाण्यासाठी महामार्गावरील दुभाजकातून रस्ता करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

या ठिकाणी महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून रम्बलर स्ट्रीप टाकण्यात आल्या आहेत; तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेने सिग्नल यंत्रणा व सीसी कॅमेरेदेखील बसविण्यात आले आहेत. परंतु महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून अद्याप येथे दुभाजक काढून रस्ता करण्यासाठीची परवानगी प्रलंबित आहे. हा रस्ता जोडला गेल्यास वखार महामंडळ चौकातील वाहतूक कोंडी कमी होईल; तसेच वाहनचालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध होऊन महामार्गावरील ताण कमी होईल.

या ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, हॉस्पिटल, शाळा तसेच प्राधिकरण सेक्टरमधील नागरिकांना एक किलोमीटर वळसा घालून यावे लागत आहे. अनेक अत्यवस्थ रुग्ण या वाहतूक कोंडीत अडकून पडतात. समोर हॉस्पिटल असतानादेखील केवळ रस्ता ओलांडून जाता येत नसल्याने एक किलोमीटर जाऊन वळण घ्यावे लागत आहे. या वाहतूक कोंडीमुळे येथील अनेक वाहनचालक जीव धोक्यात घालून विरुद्ध दिशेने प्रवास करत असल्याने येथे जीवघेणे अपघात होत आहेत.

मोशीतील पुणे-नाशिक महामार्गावरून साईनाथ हॉस्पिटल व प्राधिकरणात जाण्यासाठी रस्त्यावरील दुभाजक काढून मार्ग खुला करावा. या पर्यायी मार्गासाठी महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय व्हावा.

                                                             – संतोष बोराटे, स्थानिक नागरिक

Back to top button