पिंपरी : असंघटितांचा किमान वेतनासाठी संघर्ष; कंत्राटदारांकडून होतेय पिळवणूक | पुढारी

पिंपरी : असंघटितांचा किमान वेतनासाठी संघर्ष; कंत्राटदारांकडून होतेय पिळवणूक

दीपेश सुराणा

पिंपरी : असंघटित व कंत्राटी कामगारांना किमान वेतनासाठी अजूनही संघर्ष करावा लागत आहे. कंत्राटदारांकडून त्यांची पिळवणूक सुरू आहे. शासनाने ठरवून दिलेले वेतन आणि भत्ते मिळण्यात त्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे तुटपुंज्या पगारावर त्यांना चरितार्थ चालवावा लागत आहे. असंघटित, कंत्राटी कामगारांना महागाई निर्देशांक, वाढती महागाई लक्षात घेऊन किमान वेतन निश्चित केले जाते. महापालिकेत त्यानुसार कुशल कामगार, अर्ध कुशल कामगार आणि अकुशल कामगार यांच्यासाठी किमान वेतन निश्चित करण्यात आले आहे.

कुशल कामगारांना मूळ वेतन आणि विशेष भत्त्यासह 21 हजार 525 इतके किमान वेतन मिळणे अपेक्षित आहे.  तर, अर्ध कुशल कामगारांना मूळ वेतन आणि विशेष भत्त्यासह 20 हजार 525 तर, अकुशल कामगारांना मूळ वेतन आणि विशेष भत्त्यासह 19 हजार 25 इतके किमान वेतन मिळायला हवे. कंत्राटी कामगारांना मूळ वेतन आणि विशेष भत्ता या एकत्रित रकमेवर विविध भत्तेदेखील देय आहेत.

किमान वेतन राहते कागदावरच
असंघटित आणि कंत्राटी कामगारांच्या बाबतीत किमान वेतन हे बर्‍याचदा कागदावरच राहत आहे. असंघटित कामगारांमध्ये प्रामुख्याने सफाई कामगार, घरकामगार महिला, बांधकाम मजूर, बिगारी कामगार, वीटभट्टी कामगार अशा विविध कामगारांचा समावेश होतो. शासनाकडून त्यांना जेवढे किमान वेतन जाहीर केले जाते तेवढे बर्‍याचदा त्यांच्या हाती पडत नाही. 8 ते 15 हजार इतक्या तुटपुंज्या वेतनावर त्यांना राबविले जाते.

आरोग्य सुविधा, सुरक्षेचाही अभाव
असंघटित क्षेत्रातील कामगारांना आरोग्य सुविधा आणि कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षासाधने पुरविण्याबाबतही दुर्लक्ष केले जाते. कामगार कायद्यानुसार कामगारांना राज्य कामगार विमा योजनेचा लाभ (ईएसआय) देणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्याशिवाय, कामाच्या ठिकाणी कामगारांना आवश्यक सुरक्षा साधनेही बर्‍याचदा पुरविण्यात येत नाही.

सरकारी संस्थांमध्ये असंघटित आणि कंत्राटी कामगारांना शासनाने ठरविल्याप्रमाणे किमान वेतन मिळायला हवे. पुरुष कामगारांप्रमाणेच महिला कामगारांनाही समान वेतन मिळाले पाहिजे. कामाच्या ठिकाणी सुरक्षा, आरोग्य सुविधा, पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड, ईएसआय आदी सुविधा मिळणे गरजेचे आहे. या कामगारांना जगण्यासाठी जेवढे पैसे लागतात तेवढे पैसेही त्यांना मिळत नाही. या वर्षी 21 हजार किमान वेतन जाहीर केले असताना शाळेतील कंत्राटी सफाई कामगार महिलांना 13 हजार इतकाच पगार मिळत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

                          – बाबा कांबळे, अध्यक्ष, कष्टकरी कामगार पंचायत.

Back to top button