आकुर्डी : थरथरत्या हातांनी जपलाय मैत्रीचा बंध! | पुढारी

आकुर्डी : थरथरत्या हातांनी जपलाय मैत्रीचा बंध!

भास्कर सोनवणे

आकुर्डी (पिंपरी)  : आयुष्यभर कष्ट उपसून उभ्या केलेल्या चारभिंतीमध्ये आता सेवानिवृत्तीनंतर मन रमत नाही. मोकळी हवा घेण्यासाठी उद्यानाचा आधारच त्यांच्या उर्वरीत आयुष्याचा आधार बनलाय. समवयस्क मैत्रीचा बंध या उद्यानात फुलला अन् याचा गंध त्यांना सुखावतोय. आकुुर्डीतील संत ज्ञानेश्वर उद्यानात फेरफटका मारत असताना काही ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला…

येथे व्यक्त होण्यासाठीच जणू ते उद्यानात येतात याचा उलगडा झाला. सेवानिवृत्तीनंतर एक नवीन विश्व तयार होत असते. निवृत्तीनंतर हे एकच पद शेवटपर्यंत कायम असते. त्यामध्ये निवृत्त वरिष्ठ अधिकारी, शिक्षक, कंपनी कामगार ते उद्योजक असा जीवनाचा प्रवास केलेले ज्येष्ठ मंडळी येथे येत आहेत. त्या सर्वांचाच प्रवास थक्क करणारा आहे. आयुष्याची संध्याकाळ मित्रांसोबतच व्हावी, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

या वयात एक अनामिक भीती असते. कधी कोणते पान गळून पडेल सांगता येत नाही. जर कोणी दोन चार दिवस दिसले नाही की, आम्ही बेचैन होतो, पाठपुरावा घेतो. व्यायाम केल्याशिवाय चैन पडत नाही. सगळ्यांना भेटल्यानंतर वेगळी ऊर्जा मिळते. पूर्ण दिवस आनंदात जातो. कुठे धार्मिक, सामाजिक कार्यक्रम आहे, ती सहकार्‍यांमुळे समजते. तेथे आम्ही जातो. कुठे एकत्र जमायचे ते ठरवतो. कुठे चांगल्या ठिकाणी सहलीला जाता येईल, त्याचे नियोजन केले जाते. सध्याचे विचित्र राजकारणावरदेखील चर्चा होते. मानसिक त्रास असेल, उतारवयात काही व्याधी जडलेल्या असतील, घरातील समस्या, मुलांचे शिक्षण किंवा नोकरीविषयी असेल, तर चर्चेतून त्याचे निराकरण होते.

                                    – विद्याधर जोशी, वय 70 सेवानिवृत्त

कमी खर्चात कुठे चांगला उपचार मिळेल, त्याची सहकार्‍यांबरोबर चर्चा होते. एखादा सहकारी व्याधीने ग्रस्त असेल, त्याला आम्ही त्याविषयीची संपूर्ण माहिती देऊन योग्य ठिकाणी उपचार करण्यास सांगतो. बर्‍याच सहकार्‍यांना उद्यानातील वनौषधीबद्दल माहिती आहे. सर्वांसोबत आम्ही एकमेकांचे वाढदिवस साजरा करतो.

                           – अनिल गायकवाड, वय 67 निवृत्त अधिकारी

वयोमानानुसार कुठला व्यायाम करावा, हे सहकार्‍यांमुळे समजते. वर्षातून दोनदा तरी आम्ही सर्वच ट्रीपला जातो. आम्ही स्वत:च ट्रीप अरेंज करून मार्ग ठरवतो. यात्रा करून आल्याने आम्हाला नवचैतन्य मिळते. छान वाटते. सकारात्मक विचारांमुळे आमच्यातील आजारी व्यक्तीही लवकर बरी होते. आणि या मैत्रीच्या कट्ट्यावर कोणी तरी आपली दखल घेत आहे. या विचाराने आम्ही सुखावतो.

                           – प्रकाश अवचट, वय 66 निवृत्त अधिकारी

Back to top button