अवकाळीने शेतकर्‍यांचे अवसान गळाले | पुढारी

अवकाळीने शेतकर्‍यांचे अवसान गळाले

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील शेतकर्‍यांची अस्मानी संकटांची मालिका अद्यापही सुरूच आहे. मागील चार दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाने तर काही ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे अवसान गळाले असून, कंबरडेच मोडले आहे.
खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगामातही येथील शेतकर्‍यांवरील अस्मानी संकट पिच्छा सोडायला तयार नाही. मागील चार दिवसांपासून अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. सोमवारपासून पूर्णत: ढगाळ वातावरणाने, मॉन्सूनसदृश स्थिती निर्माण होत आहे. अवकाळी पावसामुळे उन्हाळ्यात गारवा पसरला आहे.

हा पाऊस रब्बीला मारक ठरत आहे. अवकाळी पावसामुळे लहान-मोठ्या बागायतदार शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या शेतकरीवर्गात बागायतीबरोबरच उन्हाळ्यात जनावरांसाठी गवत, वैरण साठवणे, लाकूड फाटा, खतसामग्री करण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत मध्येच अवकाळीसारखे अस्मानी संकट हे शेतकर्‍यांच्या मुळावर आल्याने शेतकरीराजा दुहेरी संकटात पडला आहे.
धरणालगत व परिसरातील कायम ओलिताखाली असलेल्या बागायतदार शेतकर्‍यांच्या काकडी, दोडका, टोमॅटो, वांगी, बटाटे, कांदा, मका आदी पिकांसह चारा, उघड्यावरील संसार, वीटभट्टी व्यावसायिकांचे या अवकाळी पावसाने नुकसान झाले. बागायत पिकांना अवकाळीसह गारपिटीचा तडाखा बसला आहे.

शेतकर्‍यांचे मनसुबे उधळले
जिल्ह्यात शेती मोठी असल्याने येथील शेतकरीवर्ग शेतीवर अवलंबून आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा मुबलक प्रमाणात पाणी असल्यामुळे शेतकर्‍यांनी कांदा, गहू, हरभरा, ज्वारी, तसेच पालेभाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र, पावसाने तडाखा दिल्याने शेतकर्‍यांचे पुढील सर्व मनसुबे उधळून लावले आहेत.

हातातोंडाशी आलेला घास हिरावला
अवकाळी पाऊस शेतकर्‍यांची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत बुधवार (दि. 15) पासून शनिवार (दि.18) पर्यंत विजांचा कडकडाट अन् ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. चारही दिवस ढगाळ वातावरण कायम होते. तसेच रविवार, सोमवारीही दिवसभर पूर्णत: ढगाळ वातावरण होते. रोगट वातावरणामुळे द्राक्षांबरोबरच कांदा, गहू, हरभरा, आंबा आणि भाजीपाल्यांवर रोगराई होऊन नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास डोळ्यांदेखत हिरावला जात आहे.

Back to top button