माउलींच्या समाधीवर महागणपती अवतार चंदन उटी पूजाबांधणी

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : चैत्र शुद्ध पाडवा, हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात माउलींच्या संजीवन समाधीवर अष्टविनायक गणपतीतील महागणपती रांजणगाव अवतार साकारण्यात आल्याची माहिती देवस्थानचे प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली. सुगंधी चंदन उटीचा वापर करीत समाधीवर महागणपती अवतार रूप साकारले. दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत याकरिता दर्शन बंद करण्यात आले होते.
या वेळी भाविकांना कारंज्या मंडपातून पादुकांचे दर्शन उपलब्ध होते. त्यानंतर दर्शनबारी सुरू करण्यात आली. या वेळी माउलींचे मनमोहक असे महागणपती रूप पाहण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आळंदीत मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले होते.
चैत्र शुद्ध पाडव्यापासून मृग नक्षत्रापर्यंत माउलींच्या संजीवन समाधीस नियमित चंदन उटी लेप लावण्यात येतो. गुढीपाडवा, रामनवमी, अक्षय तृतीया, नरसिंह जयंती आदी सण प्रसंगी समाधीस चंदन लेपात विविध रूपातील पूजा बांधण्यात येते.