पुणे : गहू मळणी करण्यात अवकाळीमुळे अडचणी ; पीक जमीनदोस्त झाल्याने हार्वेस्टर यंत्रात गहू येईना | पुढारी

पुणे : गहू मळणी करण्यात अवकाळीमुळे अडचणी ; पीक जमीनदोस्त झाल्याने हार्वेस्टर यंत्रात गहू येईना

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याचा पूर्व भागात सलग दोन-तीन वेळा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी गव्हाचे पीक भुईसपाट झाले आहे. परिणामी, हार्वेस्टर यंत्राद्वारे गव्हाची मळणी करण्यात शेतकर्‍यांना अडचण येत आहे.
तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका गव्हाच्या पिकाला बसला आहे. मागील पंधरा दिवसांत तीन-चार वेळा अवकाळी पाऊस या परिसरात पडला. अशा वेळी गव्हाचे उत्पन्न घेण्यासाठी हार्वेस्टर यंत्रधारकांनी शेतकर्‍यांच्या फेर्‍या वाढल्या आहेत.

कसेतरी करून गहू पदरात घेण्याची लगबग सुरू असताना वारंवार पडणार्‍या अवकाळीने गहू पीक भुईसपाट झाले. परिणामी, ते हार्वेस्टर यंत्राला उचलणे अवघड होत आहे. तसेच ओलसर जमिनीत यंत्रही नीट चालत नसल्याने यंत्राद्वारे मळणीत शेतकर्‍याला अडचणी होत आहेत. गहू पडलेला असल्याने तो हार्वेस्टरच्या कटरमध्ये येत नाही. तसेच पडलेला गहू हॉर्वेस्टर यंत्रामुळे तुडवला जात असल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. गहू मोठ्या क्षेत्रात असल्याने मजुरांच्या साह्याने गव्हाची कापणी करणे शक्य नाही. परंतु, हार्वेस्टर यंत्राद्वारेदेखील मळणी व्यवस्थित होत नसल्याने गहू उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

Back to top button