पिंपरीत 22 ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन | पुढारी

पिंपरीत 22 ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील 22 ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन पीपीपी (सार्वजनिक खासगी भागीदारी) तत्त्वावर उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी तब्बल 20 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या स्टेशनवर इलेक्ट्रिक वाहनांना वाजवी दरात चार्जिंग केले जाईल, असा दावा महापालिकेने केला आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ धोरणाअंतर्गत महापालिका शहरात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. बिल्ड, ऑपरेट अ‍ॅण्ड ओन मॉडेल या तत्त्वावर असलेल्या या स्टेशनच्या माध्यमातून पालिका शहरातील वाहनचालकांना वाजवी दरात वीज उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी सर्व 22 ठिकाणांसाठी एकच निविदा लवकरच काढणार येणार आहे.

पालिका त्यासाठी 8 वर्षे कराराने मोफत जागा उपलब्ध करून देणार आहे. सल्लागार एजन्सीने तयार केलेल्या आराखड्यानुसार एका स्टेशनसाठी अंदाजे 69 लाख खर्च अपेक्षित आहे. पालिका कोणत्याही प्रकारचा खर्च करणार नाही. बांधणी, देखभाल व संचालनाचा सर्व खर्च संबंधित एजन्सीला करावा लागणार आहे.

सर्व 22 स्टेशनसाठी 15 कोटी 18 लाख अधिक जीएसटी असे एकूण 20 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी सन 2023-24 या अर्थसंकल्पात 20 कोटी खर्चास सार्वजनिक खासगी भागीदारी या लेखाशिर्षाअंतर्गत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामाची सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे.

Back to top button