गुढीपाडव्यानिमित्त श्रीनाथ-जोगेश्वरीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी | पुढारी

गुढीपाडव्यानिमित्त श्रीनाथ-जोगेश्वरीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

परिंचे : पुढारी वृत्तसेवा :  गुढीपाडव्यानिमित्त श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे बुधवारी (दि. 22) चैत्र शुद्ध प्रतिपदेला श्रीनाथ म्हस्कोबा-जोगेश्वरी मंदिरात देवदर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. या वेळी श्रींच्या उत्सवामूर्तींना अलंकारीक पोशाख स्वरूपात (सीन) पूजा बांधण्यात आली होती. त्यामुळे श्रीनाथ म्हस्कोबा-जोगेश्वरी यांचे रूप अधिकच मनमोहक दिसत होते. मंगळवारीच (दि. 21) अमावास्येनिमित्त अनेक भाविक मंदिरात दाखल झाले होते. गुढीपाडव्यानिमित्त पहाटे साडेचार वाजता विधिवत पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. त्यानंतर सकाळी 6 वाजता दर्शनासाठी गाभारा खुला करण्यात आला. सकाळपासून देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे देवांना अभिषेक करण्यात आले. 10 वाजता देवाला भाविकांच्या दहीभातांच्या पूजा बांधण्यात आल्या.

दुपारी 12 वाजता धुपारती होऊन गाभारा बंद करण्यात आला. 1 वाजून 15 मिनिटांनी गाभारा पुन्हा दर्शनासाठी खुला करण्यात आला. देवाची अलंकारीक पोशाखात पूजा बांधण्यात आली. त्यानंतर पारंपरिक आडेवाचन होत वार्षिक पीक पाणी अंदाज कथन करण्यात आले. भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, वीज व जनरेटर, दर्शनबारी तीन ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था, परिसर स्वच्छता, ज्यादा कर्मचारी, स्वयंसेवक, वाहतूक पोलीस आदींचे नियोजन करण्यात आले होते. याकामी ट्रस्टचे चेअरमन, व्हॉइस चेअरमन सचिव, खजिनदार, सर्व विश्वस्त मंडळ, सल्लागार मंडळ, कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.

देवस्थान ट्रस्ट विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणार
यात्रा काळामध्ये भाविकांनी श्रीनाथांच्या दानपोटीत सढळ हाताने मदत केली आहे. त्यामुळे अनेक समाजोपयोगी उपक्रम येणार्‍या काळामध्ये राबविणात येणार आहेत. अनेक विकासकामांचे भूमिपूजनदेखील करण्यात आले आहे. त्यापैकी काही कामांना सुरुवात झाली आहे. भाविकांनी अशीच सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष धुमाळ यांनी केले.

Back to top button