पिंपरीत 1 एप्रिलपासून पुन्हा पे अ‍ॅण्ड पार्क? | पुढारी

पिंपरीत 1 एप्रिलपासून पुन्हा पे अ‍ॅण्ड पार्क?

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : वाहनचालकांनी तसेच, वाहतूक पोलिसांनी प्रतिसाद न दिल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेवर शहरातील पे अ‍ॅण्ड पार्क योजना गुंडाळण्याची नामुष्की ओढविली होती. येत्या एक एप्रिलपासून पुन्हा ही योजना शहरात सुरू करण्याच्या हालचाली महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांनी सुरू केल्या आहेत.

शहरात मोठा गाजावाजा करीत पहिल्या टप्प्यात प्रमुख 13 रस्त्यांवरील 400 ठिकाणी ही योजना राबविण्यात आली. शुल्क वसुलीचे काम ठेकेदारांने नेमलेल्या कर्मचार्‍यांकडून सकाळी 8 ते रात्री 11 या वेळेत केले जात होते. मात्र, नियोजनाच्या अभाव, वाहनचालकांचा कमी प्रतिसाद, वाहतुक पोलिसांकडून कारवाईस थंडा प्रतिसाद आदी कारणांमुळे ही योजना पालिकेस गुंडाळावी लागली. सध्या ही योजना संपूर्ण शहरात बंद आहे.

पुन्हा ही योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने मोबाईल अ‍ॅपची निर्मिती केली आहे. शहरात रस्त्यावर वाहन लावल्यास तासानुसार शुल्क द्यावे लागणार आहे. अन्यथा वाहन पार्क करता येणार नाही. त्याची अंमलबजावणी एप्रिल महिन्यापासून करण्यात येणार आहे. सुरुवातीला शहरातील दापोडी ते निगडी या 12.50 किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस पुन्हा पे अँड पार्क सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे. टप्प्याटप्याने शहरातील इतर भागामध्ये ही योजना राबवली जाणार आहे.

येत्या एक एप्रिलपासून पिंपरी-चिंचवड शहरात प्रायोगिक तत्वावर पे अ‍ॅण्ड पार्कची अमंलबजावणी करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी अभ्यास सुरू आहे. ती योजना अधिक सक्षम केली जाणार आहे. मोबाईल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या वाहतुक नियोजन विभागाचे कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.

Back to top button