पिंपरी : गृहखरेदीसाठी बुकिंग स्वस्त; घरांना नागरिकांकडून मागणी | पुढारी

पिंपरी : गृहखरेदीसाठी बुकिंग स्वस्त; घरांना नागरिकांकडून मागणी

पिंपरी : साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहूर्त समजल्या जाणार्‍या गुढीपाडव्याच्या दिवशी घरांसाठी बुकिंग करण्यावर बर्‍याच जणांचा भर असतो. त्यामुळे बुधवारी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत अनेकांनी नव्या घरासाठी बुकिंग केले. काही जणांनी सेकंड होम म्हणूनदेखील गुंतवणुकीच्या दृष्टीने गृहखरेदीला प्राधान्य दिले. शहराच्या विविध भागांत घरांचे वेगवेगळे दर आहेत. त्यातही स्वस्त घरांना नागरिकांकडून मागणी पाहण्यास मिळाली.

सुविधांचा विचार करून गृहखरेदी
गुढीपाडवा सणाच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव्या उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी, घर खरेदी आदी बाबींना प्राधान्य दिले जाते. एखाद्या शुभ दिवशी महत्त्वाचे निर्णय अथवा गृहप्रवेश करण्यावर बर्‍याच जणांचा भर असतो. गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहूर्त मानला जात असल्याने घरखरेदी व रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यावर अनेकांचा कल दिसून आला.

सध्या घरांसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. घरांचे कार्पेट आणि बिल्टअप क्षेत्र, त्यासोबत मिळणार्‍या विविध सुविधा, घराजवळ बाजारपेठ, शाळा व अन्य बाबींची उपलब्धता यांचा विचार करून घरखरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढत चालला आहे. त्याचीच प्रचिती पाहण्यास मिळाली. गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत बर्‍याच जणांना मनपसंत घराची निवड केली.

घरांच्या दरात चढउतार
शहरातील विविध भागांमध्ये घराच्या दरामध्ये चढउतार पाहण्यास मिळतात. सदनिकेच्या क्षेत्रानुसार आणि रेडिरेकनर दरानुसार त्यामध्ये बदल पाहण्यास मिळतो. चिखली, मोशी या पट्ट्यात घरांचे दर कमी आहेत. त्या तुलनेत वाकड, पिंपळे सौदागर, चिंचवड, ताथवडे, पिंपरी आदी भागांमध्ये घरांचे दर जास्त असल्याचे चित्र पाहण्यास मिळते.

वाहनांच्या खरेदीत वाढ
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पिंपरी-चिंचवडमध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांच्या खरेदीमध्ये एरवीपेक्षा 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 4 ते 5 हजार दुचाकी, 2 ते 3 हजार चारचाकी वाहनांची विक्री झाली होती. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आकर्षक सुविधा होत्या. याचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांनी शोरूममध्ये गर्दी केली होती.

गुढीपाडवा सणानिमित्त घरांसाठी बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला. महिनाभराच्या तुलनेत गुढीपाडव्यास जवळपास 50 टक्के बुकिंग झाले. 1 एप्रिलपासून रेडिरेकनरचे दर वाढल्यानंतर घरांच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते.

                                     – नरेंद्र आगरवाल, बांधकाम व्यावसायिक

गुढीपाडव्यानिमित्त़ नवीन घरासाठी बुकिंग आणि प्रत्यक्ष गृहप्रकल्पांना भेट देऊन पाहणी करण्यावर नागरिकांचा कल होता. परवडणार्‍या किंमतीतील घरांसाठी सध्या चांगली मागणी आहे. आज काही जणांनी घरांची पाहणी करून आवश्यक सुविधा, किंमत, कार्पेट क्षेत्र यांची पडताळणी केली.

                                    – योगेश भोंगाळे, बांधकाम व्यावसायिक

पाडव्याच्या मुहूर्तावर चारचाकी वाहनांची सायंकाळपर्यंत 100हून अधिक विक्री झाली होती. नव्याने लाँच वाहनांची तासाभरात मोठ्या प्रमाणात बुकिंग झाली. या वेळी किमान 20 ते 25 टक्क्यांहून अधिक वाहनांची खरेदी झाली होती.

                                          – रवींद्र पवार, वाकड

Back to top button