त्यांचा गुढीपाडवा मात्र उन्हातच ! | पुढारी

त्यांचा गुढीपाडवा मात्र उन्हातच !

निमगाव दावडी : पुढारी वृत्तसेवा : गुढीपाडवा सर्वत्र मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र, परजिल्ह्यांतून खेड तालुक्यात आलेल्या उसतोड मजुरांनी मात्र रखरखते ऊन, सोसाट्याचा वारा, कुठे पाऊस अशा वातावरणात मुक्त राहुट्यांमध्येच सण साजरा केला. कामाचा व विषम हवामानाचा ताण असतानाही आनंदाने राहुट्यांवर गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले. खेड तालुक्यात उसतोडणीसाठी मजूर मोठ्या संख्येने आले आहेत. गुढीपाडव्यानिमित्त त्यांनी बुधवारी (दि. 22) एक दिवस कोयता बंद ठेवला. सकाळपासून आपल्या राहुट्यांपुढे शेणसडा टाकून रांगोळी काढली.

झोकात नवीन वर्षाच्या स्वागताची गुढी उभारली. जमेल तसे गोडाधोडाचे जेवणही केले. विषम हवामानाचा ताण तर जीवनाचाच भाग समजून सणाचा आनंद त्यातूनही मिळवला. तीच गोष्ट मेंढपाळांची. दोघेही आपली गावे सोडून मजुरी व अन्न पाण्यासाठी भटकंती करत असतात. आपल्या रुढी-परंपरा, सण, उत्सव जमेल तसे गोडधोड करून साजरे करतात .

महिला स्वयंपाकात, तर पुरुष गुढी उभारण्यात व्यस्त
परळी वैजनाथ (जि. बीड) येथील कालिंदाबाई पवार, रेश्मा पवार यांनी नवीन साडी परिधान करून पुरणपोळीचे जेवण, नैवेद्य दाखवून मनोभावे गुढीची पूजा केली. बाबा पवार, बालाजी पवार यांनी गुढी उभारणी व जागा स्वच्छ करणे कामी मदत केली. खेड तालुक्यात भीमाशंकर व संत तुकाराम साखर कारखाना ऊस मजूर अनेक दिवसांपासून वास्तव्यास आहेत. मांजरेवाडी येथील नर्मदेश्वर परिसरातही ऊस टोळ्यांनी गुढीपाडवा गोड केला.

Back to top button