पिंपरी : लागोपाठ सणांमुळे; पोलिसांवर ताण ! | पुढारी

पिंपरी : लागोपाठ सणांमुळे; पोलिसांवर ताण !

संतोष शिंदे

पिंपरी : मुस्लिमबांधवांचा रमजान महिना सुरू होत आहे. साधारण 22 एप्रिलच्या मागेपुढे रमजान ईद साजरी करण्यात येईल. दरम्यानच्या काळात अन्य धर्मियांचेदेखील सण आहेत. सणासुदीच्या दिवसात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी महासंचालक कार्यालयाकडून गोपनीय यंत्रणांना अलर्ट देण्यात आला आहे.

उद्यापासून रमजान महिना सुरू होत आहे. या महिन्यात मुस्लिमबांधव पारंपरिक पद्धतीने उपवास (रोजे) करतात. दरम्यानच्या काळात श्रीराम नवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती, ईस्टर संडे, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असे मोठे उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. अलीकडे काही समाज कंटक सोशल मीडियावर धार्मिक दुरावा निर्माण करण्याचे काम करीत असतात. या पार्श्वभूमीवर महासंचालक कार्यालयाकडून खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यानुसार, घटक प्रमुखांनीदेखील गोपनीय यंत्रणांना अलर्ट देऊन पोलिसांना सूचना केल्याची सूत्रांची माहिती आहे. नागरिक सणाचे महत्त्व पटवून देत सोशल मीडियावर शुभेच्छा संदेश पाठवतात. काही इतर धर्मीयांच्या सणाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करतात. त्यामुळे सामाजिक दुरावा निर्माण होते. मात्र, या पोस्टवर सायबर सेलचे लक्ष असणार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. संजय तुंगार यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

फ्लेक्स बाजीवर निर्बंध
फ्लेक्सवर आक्षेपार्ह मजकूर असल्यामुळे वादंग निर्माण झाल्याच्या घटना यापूर्वी राज्यात घडल्या आहेत. आपल्या भागामध्ये वर्चस्व सिद्ध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा फलक लावल्या जातात. राजकीय पक्ष किंवा संघटनांकडून प्रक्षोभक विधान असलेले फ्लेक्स लावले जातात. त्यासाठी कोणतीही परवानगी घेतली जात नाही. त्यामुळे अशा फलकांवर यावर्षी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भोंग्याच्या आवाजावर लक्ष
न्यायालयाचा आदेशानुसार ध्वनिक्षेपकावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यावर काही संघटनांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसही भोंग्यावरही लक्ष ठेवून आहेत.

मार्च, एप्रिल महिन्यात आलेले महत्त्वाचे सण
श्रीराम नवमी – 30 मार्च
महावीर जयंती – 3 एप्रिल
हनुमान जयंती – 6 एप्रिल
गुड फ्रायडे – 7 एप्रिल
ईस्टर संडे – 9 एप्रिल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – 14 एप्रिल
अक्षय तृतीया -छत्रपती शिवाजी महाराज जयंती (परंपरेनुसार)
बसवेश्वर जयंती – 22 एप्रिल

Back to top button