गुढीपाडवा मोठ्या उत्साहात; शोभायात्रांमुळे पिंपरीत जल्लोषाचे वातावरण | पुढारी

गुढीपाडवा मोठ्या उत्साहात; शोभायात्रांमुळे पिंपरीत जल्लोषाचे वातावरण

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा पिंपरी- चिंचवड शहरवासीयांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. सूर्योदयानंतर घरावर गुढ्या उभारल्या जात होत्या. तसेच शहरात विविध संस्था व संघटनांच्या वतीने ढोल-ताशांच्या दणदणाटात शोभायात्रा काढण्यात आल्या. घरावर गुढी उभारून नागरिकांनी मनोभावे गुढीची पूजा केली आणि गुढीस नैवेद्य दाखवला. सुटीचा दिवस असल्यामुळे अनेकांनी खरेदीचा आनंद लुटला.

शहरातील विविध संघटनांतर्फे सकाळी मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणूक मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. या वेळी रस्ते गर्दीने फुलून गेले होते. शोभायात्रांमध्ये महिला आणि तरुणाईचा मोठा सहभाग होता. शोभायात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांची वेशभूषा केलेले चिमुकले शोभायात्रेत सहभागी झाले होते.

ढोल-ताशांचा गजर, भजनी मंडळ, पालखी मिरवणूक आणि लाठी-काठीची प्रात्यक्षिके पाहण्यासोबत शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी शहरवासीयांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली. पारंपरिक वेशभूषेत अबालवृद्धदेखील सहभागी झाले होते. सर्वांनी हा उत्सव जल्लोषात साजरा केला. प्रत्येकजण एकमेकांना आलिंगन देत हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करताना दिसत होते.

महिलांसाठी खास बाईक रॅलीचेदेखील आयोजन केले होते. डोक्यावर फेटा, नथ, नऊवार साडी असा पारंपरिक पोशाख करून महिलांनी उत्साहात रॅलीमध्ये सहभाग नोंदविला. काही ठिकाणी घोडेस्वार तरुणी आणि लेझीम पथकांनी शोभायात्रेची शान वाढविली. सोशल मीडियावरून दिवसभर पाडव्यानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. अनेकांनी गुढीपाडव्याचे स्टेटस आणि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केले.

Back to top button