पुणे : पालिकेचा नोकर भरती पॅटर्न चर्चेत | पुढारी

पुणे : पालिकेचा नोकर भरती पॅटर्न चर्चेत

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यभरातील जवळपास 10 ते 15 महापालिकांनी पुणे महापालिकेच्या भरती प्रक्रियेची माहिती घेतली आहे. त्यानुसार नोकर भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे महापालिकेने मागील वर्षी राबविलेली नोकर भरती प्रक्रिया राज्यभरातील महापालिकांसाठी मार्गदर्शक पॅटर्न ठरत आहे. कोरोनाच्या आर्थिक संकटानंतरही महापालिकेचा वाढता विस्तार व कामाचा ताण लक्षात घेऊन जुलै 2022 मध्ये नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पालिकेने केंद्रीय नोकर भरतीसाठी काम देण्यात येणार्‍या आयबीपीएस या संस्थेला भरती प्रक्रियेचे काम दिले. देशाची अग्रणी बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि इतर काही प्रमुख बँकांनी या संस्थेची स्थापना केलेली आहे. त्या माध्यमातून पालिकेने 448 जागा भरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये या प्रक्रियेचा निकाल लागला. 30 डिसेंबरला यातील पहिले पद महापालिकेने भरले, तर जानेवारी 2023 मध्ये सुमारे 445 जणांची महापालिकेत नियुक्ती झाली.

महापालिकेकडून राबविण्यात आलेली नोकर भरती प्रक्रिया बहुतांशवेळा भरतीपेक्षा गैरव्यवहाराच्या तक्रारी आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे चर्चेचा विषय बनते. अनेकवेळा भरतीचे वाद न्यायालयात जातात. मात्र, महापालिकेने राबविलेल्या भरती प्रक्रियेबाबत एकही तक्रार प्रशासनाकडे आली नाही अथवा इतर कोणतेही गैरव्यवहार तसेच देवाणघेवाणीचे आरोपही प्रशासनावर झाले नाहीत.
त्यामुळे महापालिकेने यशस्वीपणे राबविलेल्या या भरती प्रक्रियेची माहिती बीड, छत्रपती संभाजीनगर, एमआयडीसी, नवी मुंबई, सोलापूर, मीरा-भाईंदर, नागपूर या प्रमुख महापालिकांसह अनेक नगरपालिकांनी मागितली, तर अनेक महापालिकांचे अधिकारी प्रत्यक्षात पुण्यात येऊन भेटून गेल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सांगितले. अवघ्या सहा महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे अनेक महापालिका पुण्याचे अनुकरण करण्यास इच्छुक असल्याचेही बिनवडे यांनी सांगितले.

Back to top button